धनंजय मुंडे आणि सुरेश धस पहिल्यांदा एकाच मंचावर; मनोमिलन होणार का?
Dhananjay Munde- Suresh Dhas : धनुभाऊ आणि धस अण्णा हे आज एकाच मंचावर येत आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर जिल्ह्याचे सामाजिक, राजकीय समीकरणं पूर्णपणे बदलले. आमदार धस यांनी याप्रकरणात मुंडेंवर गंभीर आरोप केले. त्यानंतर दोघे नेते एकाच मंचावर येत असल्याने सर्वांचे त्याकडे लक्ष्य लागले आहे.

माजी मंत्री धनंजय मुंडे आणि भाजपाचे आमदार सुरेश धस हे आज एकाच मंचावर येत आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अत्यंत क्रूर आणि माणुसकीला काळिमा फासणाऱ्या हत्येनंतर बीड जिल्ह्याचे सामाजिक, राजकीय समीकरणं पूर्णपणे बदलले. जिल्ह्यातील राजकारणाने जातीय कूस बदलली आहे. त्यानंतर जिल्ह्यात अनेक नेत्यांच्या चेलेचपाट्यांचे दादागिरीचे व्हिडिओ धडाधड समाज माध्यमांवर व्हायरल झाले. देशमुख यांच्या प्रकरणात आमदार धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले. मध्यंतरी दोन्ही नेत्यांमध्ये भेट सुद्धा झाली. पण बंद दाराआड झालेल्या या भेटीने धस यांना अडचणीत आणले होते. त्यानंतर धस पुन्हा आक्रमक दिसले. आता दोघे नेते एकाच मंचावर येत असल्याने सर्वांचे लक्ष्य लागले आहे.
भगवानबाबा गडावर मनोमिलन?
मास्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर माजी मंत्री धनंजय मुंडे आणि आमदार सुरेश धस यांच्यात कमालीचा संघर्ष निर्माण झाला होता. आज ते दोघेजण एका कार्यक्रमाचे निमित्त एकत्र येत आहेत .आज संत भगवान बाबा गडाचा नारळी सप्ताहाची सांगता शिरूर कासार तालुक्यातील पिंपळनेर या गावी होणार आहे. यावेळी महंत नामदेव शास्त्री यांच्या काल्याचे किर्तन आहे. या ठिकाणी दोन्ही नेते एकाच मंचावर येतील.




नामदेव शास्त्रींची शिष्टाई कामी येईल?
महंत नामदेव शास्त्री हे मंत्री धनंजय मुंडे व आमदार सुरेश धस यांना कोणता सल्ला देतात? याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे. सामाजिक सलोखा वाढवण्यासाठी नामदेव शास्त्री या दोघांचेही कान टोचण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आमदार सुरेश धस आणि धनंजय मुंडे हे दोघेही एकाच मंचावर येणार असल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे. या कार्यक्रमासाठी धनंजय मुंडे हे खास हेलिकॉप्टरने मुंबईवरून दहा वाजण्याच्या सुमारास कार्यक्रम स्थळी येतील. या कार्यक्रमानंतर आमदार सुरेश धस आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यात दिलजमाई होणार का? याची सध्या जिल्ह्यात चर्चा रंगली आहे.