अक्षय कुडकेलवार, Tv9 मराठी, बीड | 27 सप्टेंबर 2023 : भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) या सध्या प्रचंड आर्थिक अडचणीतून जात आहेत. पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ साखर कारखान्याला जीएसटी विभागाकडून जप्तीची नोटीस पाठवण्यात आलीय. कारखान्याने तब्बल 19 कोटींचा जीएसटी कर चुकवला नसल्याचं नोटीसमध्ये सांगण्यात आलं आहे. विशेष म्हणजे जीएसटी विभागाची ही फक्त नोटीस नसून कारवाईच आहे, असं स्वत: पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. आपल्याला अडचणींच्या काळात केंद्र सरकारकडून मदत मिळाली नाही. इतर सर्व साखर कारखान्यांना मदत मिळाली. केवळ आपल्या कारखान्यांना मदत मिळाली नाही, असं म्हणत पंकजा यांनी नाराजी व्यक्त केलीय. या सर्व घडामोडींनंतर आता पंकजा यांच्या मदतीसाठी त्यांचे भाऊ मंत्री धनंजय मुंडे धावून जाणार आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंकजा मुंडे यांचा कारखाना वाचवण्यासाठी भावाने कंबर कसली आहे. कारखाना वाचवण्यासाठी मंत्री धनंजय मुंडे मार्गदर्शन करणार आहेत. कारखान्याकडून सरकारला प्रस्ताव पाठवण्याबाबत सांगण्यात येणार आहे. या विषयावर धनंजय मुंडे स्वत: पंकजा मुंडे यांच्याशी चर्चा करणार आहेत. वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना वाचवण्यासाठी धनंजय मुंडे यांच्याकडून प्रयत्न केले जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
छत्रपती संभाजीनगरच्या जीएसटी आयुक्तांनी पंकजा मुंडे यांना त्यांच्या कारखान्याचा 19 कोटींचा जीएसटी कर थकवल्याप्रकरणी वसुली आणि जप्तीची नोटीस पाठवली आहे. याच पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे पुढाकार घेणार असल्याची माहिती मिळत आहे. प्रशासकीय स्तरावर कारखान्यासाठी काय केलं पाहिजे, याबाबत धनंजय मुंडे कारखान्याचे पदाधिकारी आणि पंकजा मुंडे यांना मार्गदर्शन करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
धनंजय मुंडे स्वत: आज किवा उद्या पंकजा मुंडे यांच्याशी या मुद्द्यावर चर्चा करणार आहेत. धनंजय मुंडे हे सुद्धा गेल्या काही काळापासून वैद्यनाथ साखर कारखान्याशी जोडले गेले आहेत. त्यांच्यासुद्धा भावना या कारखान्याशी जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे हा कारखाना वाचवण्यासाठी प्रयत्न करणे, याला त्यांच्या व्यवसायिक दृष्टीकोनापेक्षा भावनिक कारण जास्त आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या मदतीला धनंजय मुंडे धावून जाणार आहेत.
पंकजा मुंडे यांना या कारखान्याबाबत काही पदाधिकाऱ्यांकडून काही चुकीची माहिती दिली जात असेल तर त्याबाबत योग्य माहिती दिली जाणार आहे. राज्य सरकार म्हणून काय केलं जायला पाहिजे, याबाबत धनंजय मुंडे पंकजा मुंडे यांना मार्गदर्शन करणार आहेत.