बीडच्या घटनेनंतर मनसे नेते प्रकाश महाजन अस्वस्थ, स्वत:कडे असलेल्या बंदुकीबाबत घेतला मोठा निर्णय
बीडच्या केजमधील संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेवर मनसे नेते प्रकाश महाजन यांनी आज प्रतिक्रिया दिली. देशमुख यांच्या हत्येने प्रकाश महाजन अस्वस्थ झाले आहेत. त्यांनी शस्त्र परवान्यांच्या वितरणाबाबत सरकारकडून कडक नियमन करण्याची मागणी केली आहे.
बीडच्या केजमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेमुळे मनसे नेते प्रकाश महाजन हे अस्वस्थ झाले आहेत. प्रकाश महाजन यांनी या घटनेवर आज ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. “बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरण अत्यंत दुर्दैवी आहे. हे सर्व पाहून मी अस्वस्थ झालो आहे. पूर्वी शस्त्र परवाना केवळ शेतकऱ्यांना मिळायचा. आता मात्र कोणालाही वाटले गेले. माझ्याकडे देखील परवानगी असलेले शस्त्र आहे. पाच गोळ्यांची मोठी बंदूक आहे. सध्याची परिस्थिती पाहता माझ्याकडे शस्त्र आहे, हे सांगण्याची लाज वाटत आहे. त्यामुळे मी माझे शस्त्र शासनाकडे जमा करणार आहे”, असा मोठा निर्णय प्रकाश महाजन यांनी जाहीर केला.
“पोलीस आयुक्तांनी मला सोमवारी वेळ दिला आहे. माझे शस्त्र मी जमा करणार आहे”, अशी माहिती प्रकाश महाजन यांनी दिली. “सरकारने निकष पाहून शस्त्र परवाने द्यावेत आणि ज्यांना दिली आहेत त्यांची चौकशी करून शस्त्र परवाना रद्द करावा”, असं आवाहन प्रकाश महाजन यांनी केलं. “माझ्याकडे बंदूक आहे, मात्र कधीही चालविण्याची किंवा फायर करण्याची वेळ आली नाही”, असंही प्रकाश महाजन यावेळी म्हणाले.
‘गुन्हेगारांना संरक्षण देणाऱ्यांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे’
“संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या केली. गुन्हेगारांना संरक्षण देणाऱ्यांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे. मस्साजोग आणि माझं वेगळं नातं आहे. माझ्या वडिलांनी मस्साजोगची शाळा सुरू केली आणि त्या गावातल्या होतकरू तरुणाची हत्या केली. मनुष्य हा पशू पेक्षाही क्रूर झालाय”, असं प्रकाश महाजन म्हणाले.
‘आजकाल शस्त्र बाळगणं हे स्टेटस’
“शस्त्र परवाना शेतकरी लोकांना मिळायचा. आजकाल शस्त्र बाळगणं हे स्टेटस झालं आहे. बीड जिल्ह्यात जी शस्त्र वाटली गेली त्याचा उबग आला. माझ्याकडे एक शस्त्र आहे, ते लोकसभेला जमा केलं. संभाजीनगरच्या पोलीस आयुक्तांसोबत बोललो. मी माझे शस्त्र पोलिसांकडे जमा करणार आहे”, असं प्रकाश महाजन यांनी सांगितलं.
‘…तर बीडमध्ये 1250 पैकी 50 सुद्धा शस्त्र दिसणार नाहीत’
“माझ्याकडे जी रायफल आहे, त्यातून 5 राऊंड फायर होते. मला ते नको वाटतयं. मी शेती करत होतो म्हणून बंदूक घेतली होती. माझं वय पाहता, मी माझी बंदूक किती काळ सांभाळू शकतो माहिती नाही. शासनाने जर नियामांची अंमलबजावणी केली तर बीडमध्ये 1250 पैकी 50 सुद्धा शस्त्र दिसणार नाहीत”, असं प्रकाश महाजन म्हणाले.