बीड : महाराष्ट्राच्या राजकारणात मुंडे भावा-बहिणीच्या जोडीची चांगलीच चर्चा असते. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे या बहिण-भावामध्ये सातत्याने वादाच्या किंवा मतभेदांच्या बातम्या समोर येत असतात. अनेकदा जाहीर मंचावर हे बहीण भाऊ एकत्र आलेले दिसतात. पण एकाच मंचावरुन ते एकमेकांवर अप्रत्यक्षपणे टीकाही करताना दिसतात. तर कधी धनंजय मुंडे रुग्णालयात आजारी असताना बहीण पंकजाताई त्यांना फोन करुन तब्येतीची विचारसपूस करतात. एकीकडे टोकाचा राजकीय संघर्ष तर कधी मायेचा ओलावा, असं या भावंडांमधील नातं आहे.
नुकतंच जवाहर शिक्षण संस्थेच्या निवडणुकीत पंकजाताई आणि धनंजय मुंडे यांच्यात टोकाचा संघर्ष बघायला मिळाला होता. मात्र गोपीनाथ गडावर असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात दोन्ही बाजूने संघर्ष टाळण्याचा प्रयत्न सुरु असल्याचं चित्र समोर येताना दिसत आहे. बीडच्या राजकारणात पहिल्यांदाच पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी एकत्रित येऊन वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ठरवली आहे. त्यामुळे वैद्यनाथ साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये मुंडे बंधू-भगिनी एकत्र आल्याची चर्चा रंगू लागली आहे.
भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या पाठोपाठ आज त्यांच्या भगिनी खासदार प्रीतम मुंडे, अॅड. यशश्री मुंडे आणि त्यांच्या मातोश्री प्रज्ञा गोपीनाथराव मुंडे यांनी ही वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी मात्र आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही.
सध्या मिळत असलेल्या माहितीनुसार, 21 जागांसाठी (संचालकांच्या निवडीसाठी) ही निवडणूक पार पडणार आहे. यापैकी 11 जागा या पंकजा मुंडे यांच्या गटाकडे असतील. तर 10 जागांवर धनंजय मुंडे यांचे उमेदवार असतील. विशेष म्हणजे या निवडणुकीमध्ये यापूर्वी ज्या नेत्यांनी भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता, अशा सगळ्या उमेदवारांना दोन्ही बहीण-भावाने बाजूला ठेवल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी 50 जणांनी अर्ज दाखल केले आहेत. या अर्जांची आज छाननी होणार आहे. या निवडणुकीत अर्ज मागे घेण्याची मुदत ही 1 जूनपर्यंत आहे. तर 11 जूनला 21 जागांसाठी मतदान पार पडेल. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजेच 12 जूनला मतमोजणी केली जाणार आहे. दरम्यान, या निवडणुकीसाठी धनंजय मुंडे यांनी अर्ज भरलेला नाही. तसेच मुंडे भाऊ-बहीण हे पहिल्यांदाच निवडणुकीत एकत्र येण्याची शक्यता आहे.