‘गोपीनाथ मुंडे यांच्याकडे माझ्यापेक्षाही जास्त अनुभव होता’; पंतप्रधान मोदींकडून बीडच्या सभेत आठवणींना उजाळा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज बीडमध्ये प्रचारसभा पार पडली. बीडच्या भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचारसभेत मोदी बोलत होते. यावेळी मोदींनी दिवंगत भाजप नेते पंकजा मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला.

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज बीडमध्ये सभा पार पडली. या सभेत नरेंद्र मोदी यांनी दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला. “मी संत भगवान बाबा संत नारायण महाराज यांना नमन करतो. योगेश्वर देवीला प्रमाण करतो. बीडचे आमचे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत हृदयाचं नातं राहिलेलं आहे. ते नेहमी मला बीड आणि मराठवाड्याच्या विकासासाठी चर्चा करत होते. मी त्यांना भावपूर्ण याद करत आहे. सहकाऱ्यांनो माझं एक दुर्दैवं राहिलंय, तुम्ही मला 2014 मध्ये देशसेवेची जबाबदारी दिली तेव्हा मी देशभरातील गोपीनाथ मुंडे यांच्यासारख्या सहकाऱ्यांना निवडून दिल्ली घेऊन गेलो होतो, जेणेकरुन आम्ही एकत्रपणे देशाची सेवा करु. गोपीनाथ मुंडे यांच्याकडे माझ्यापेक्षाही जास्त अनुभव होता. पण माझं हे दुर्दैवं राहिलं की, सत्तेत आल्यानंतर थोड्याच दिवसांमध्ये मला माझ्या सहकाऱ्याला गमवावं लागलं”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.
“या कार्यकाळात मला माझे अनेक सहकारी गमवावे लागले. गोपीनाथ मुंडे, अरुण जेटली, सुषमा स्वराज, मनोहर पर्रीकर. तुम्ही कल्पना करु शकता का, माझे हात जेव्हा आपले गेले तेव्हा माझ्या अडचणी किती वाढल्या असतील? त्यामुळे या सर्व सहकाऱ्यांची मला खूप आठवण येणं, इथे आलो आहे तर स्वभाविकपणे गोपीनाथ मुंडे यांची आठवण येणं, मला ती कमी जाणवते. इथे आल्यावर ते मला जाणावतं”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.
नरेंद्र मोदी यांची इंडिया आघाडीवर टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी इंडिया आघाडीवर सडकून टीका केली. “आज तिसऱ्या टप्प्यातील मतदान संपत आहे. यासोबतच इंडी आघाडीच्या आशाही संपल्या आहेत. पहिल्या टप्प्यात इंडी आघाडी फस्त झाली. दुसऱ्या टप्प्यात उद्ध्वस्त झाली, आणि आज तिसऱ्या टप्प्यात इंडी आघाडीचा कुठे छोटा-मोठा दिवा जळत होता तो सुद्धा विजला आहे”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.
‘काँग्रेससोबत नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी’
“हा मोदी आहे, तुम्हीसुद्धा जाणता, मी आपल्याला गॅरंटी देतो, जोपर्यंत मोदी जिवंत आहे, दुनियाची कोणतीही ताकद दलित, वंचित, मागस, ओबीसींचं आरक्षण मागे घेऊ शकत नाही ही मोदीची ताकद आहे. आज कोणतीही राष्ट्रवादी ताकद काँग्रेससोबत उरलेली नाही. असली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपसोबत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा असली शिवसेना पक्ष भाजपसोबत आहे, आणि काँग्रेससोबत कोण आहे? नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी काँग्रेस, आणि हे करत काय आहेत? ते नकली वचन देत आहेत. नकली व्हिडीओ बनवत आहेत”, असा घणाघात नरेंद्र मोदींनी केला.
“काँग्रेसची सवय आहे, न काम करा आणि न काम करुद्या. मी गुजरात आणि महाराष्ट्र दरम्यान बुलेट ट्रेनचं काम सुरु केलं. काँग्रेसने आधी त्याची थट्टा केली. मग विरोध केला. जोपर्यंत महाविनाश आघाडीचं सरकार राहीलं तोपर्यंत या लोकांनी काम पुढे होऊ दिलं नाही. आता परत त्यांचं सरकार आलं तर बुलेट ट्रेनचं काम ठप्प करुन देणार. एकीकडे भाजप आपल्या वचननाम्यात बुलेट ट्रेनच्या विस्ताराची बात करत आहे, दुसरीकडे काँग्रेस आणि इंडिया आघाडी बुलेट ट्रेनचा विरोध करत आहे”, अशी टीका नरेंद्र मोदींनी केली.
“आता तुम्ही मला सांगा 21 व्या शतकाच्या भारताला कोणतं सरकार हवं? देशाला या विकास विरोधी लोकांच्या हातात देऊ शकता का? काँग्रेस जिथे आली आहे त्यांनी स्वप्नांचा भंग केला आहे. महाराष्ट्र आणि मराठवाड्याने ते भोग भोगले आहेत. इंडी आघाडीने कधी इथे दुष्काळाच्या परिस्थितीवर लक्ष दिलं नाही. त्यांनी फक्त फिती कापल्या आणि भ्रष्टाचार केलं. 60 वर्षांपासून मराठवाडा जलग्रीड परियोजना ठप्प पडली होती. आज एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणीस आणि अजित पवार यांनी मिळून सिंचन योजनेला मिशन मोडमध्ये पुढे नेत आहेत”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.