Beed : जिवंत व्यक्ती थेट मृतांच्या यादीत, अंबाजोगाईत नेमका प्रकार काय घडला? वाचा सविस्तर
जिवंत व्यक्तीचा समावेश मृतांच्या यादीत केला असल्याचा हा प्रकार अंबाजोगाईत उघडकीस आला आहे.
बीड : बीडमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रशासनाने कोरोना काळात मृत्यू झालेल्यांची यादी तयार केली, मात्र त्या यादीत घोळ असल्याचे समोर आले आहे, कारण प्रशासनाच्या यादीत मृत मात्र प्रत्यक्षात जिवंत असा प्रकार बीडमध्ये समोर आला आहे. जिवंत व्यक्तीचा समावेश मृतांच्या यादीत केला असल्याचा हा प्रकार अंबाजोगाईत उघडकीस आला आहे.
प्रशासनाच्या यादीने काही काळ गोंधळ
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईच्या प्रशांतनगर भागातील नागनाथ काशिनाथ वारद हे कोरोना पॉझिटिव्ह आले होते. त्यादरम्यान त्यांच्यावर उपचार होऊन त्यांना घरी पाठविण्यात आले. मात्र त्यांचे नाव थेट मृतांच्या यादीत आल्याने ते पुरतेच गोंधळून गेले. दरम्यान अंबाजोगाईच्या कोविड सेंटरमध्ये नागनाथ विश्वनाथ वारद हे 77 वर्षीय व्यक्ती देखील उपचार घेत होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. प्रशासनाकडून मृतांच्या यादीत दोघांनाही मृत दाखविल्याने काही काळ गोंधळ उडाला. शिवाय सध्या व्हायरल होणारी एक यादी देखील बोगस असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
प्रशासनाच्या यादीत घोळ
व्हायरल झालेली यादी बोगस असल्याची माहिती प्रसासनाकडूनच देण्यात आल्याने कोणती यादी खरी? असा सवाल आता लोकांसमोर उपस्थित झाला आहे. त्यामुळे अनेकजण गोधळून गेले आहेत. याआधीही प्रसासनाच्या यादींमध्ये चुका अढळून आल्या आहेत. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत अनेकांनी आपला जीव गमावला आहे. कुणी आपले आई-वडिल गमावले आहेत, तर कुणी घरतली करती माणसं. याची दखल घेत शासनाकडून मृतांच्या कुटुंबियांना 50 हजारांची आर्थिक मदत देण्याचे जाहीर करण्यात आले आहे, त्यासाठी अनेकजण कागदपत्रांची जुळवाजुळव करत आहेत, अशातच प्रशासनाच्याच यादी घोळ आढळून आल्याने लोकांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने हा घोळ मिटवून याबाबत ठोस माहिती उपलब्ध करून द्यावी अशी मागणी लोकांकडून करण्यात येत आहे.