‘कोण हे टक्केवारीवाले…; वाल्मिक कराडचा वकील चवताळला, कोर्टाबाहेर मोठा हंगामा
?"आदरणीय आण्णावर (वाल्मिक कराड) खोटे गुन्हे दाखल झाले असतील, अशा प्रकारे कुणी स्टंटबाजी करत असेल तर ते आम्ही कदापि सहन करणार नाही. खपवून घेणार नाही. अहो कोण हे टक्केवारीवाले. कुणाला किती टक्केवारी मिळते ते आम्हाला माहिती आहे", असं वाल्मिक कराडचे वकील आक्रमकपणे म्हणाले.
बीड सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याला 7 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावण्यात आली आहे. कोर्टाची आजची सुनावणी पार पडल्यानंतर पोलीस आरोपी वाल्मिक कराड याला पोलीस व्हॅनमधून जेलच्या दिशेला घेऊन गेले. यावेळी कोर्टाबाहेर मोठा गदारोळ बघायला मिळाला. काही महिला आंदोलकांकडून कोर्टाबाहेर वाल्मिक कराडला फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी करत घोषणाबाजी करण्यात आली. यानंतर वाल्मिक कराडचे समर्थकदेखील कोर्टाबाहेर जमले. त्यांच्याकडूनही जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. विशेष म्हणजे यावेळी वाल्मिक कराडची कोर्टात बाजू मांडणारे वकील सिद्धेश्वर ठोंबरे यांनी देखील जोरदार घोषणाबाजी केली. ते देखील वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आंदोलनात सहभागी झाले. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पोलिसांनी दोन्ही बाजूच्या आंदोलकांना ताब्यात घेतलं. यावेळी वाल्मिक कराडचे वकील सिद्धेश्वर ठोंबरे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.
“सगळ्याच महत्त्वाचं सांगतो, मी एक वकील आहे. त्याचबरोबर भारतीय संविधानाने मला माझी भूमिका मांडण्याचा अधिकार दिला आहे. सर्वात महत्त्वाचा विषय आहे, आदरणीय आण्णावर (वाल्मिक कराड) खोटे गुन्हे दाखल झाले असतील, अशा प्रकारे कुणी स्टंटबाजी करत असेल तर ते आम्ही कदापि सहन करणार नाही. खपवून घेणार नाही. अहो कोण हे टक्केवारीवाले. कुणाला किती टक्केवारी मिळते ते आम्हाला माहिती आहे”, असं वकील आक्रमकपणे म्हणाले.
‘आण्णावर दाखल झालेले खोटे गुन्हे मागे घ्या’
“थोडं साईड द्या. एक सेकंद. सायलेंट. मला न्यायालयाची मर्यादा माहिती आहे. पण त्या सुद्धा एक वकील आहेत. मला नाव सांगता येणार नाही. घोषणाबाजी करणाऱ्या त्यादेखील वकील आहेत. एखादी बाजू मांडत असताना स्टंटबाजी करणार असाल तर ते सहन होणार नाही. संतोष देशमुखांना न्याय मिळाला पाहिजे. पण त्याचबरोबर जे दंगली घडून आणण्याचा प्रयत्न करत असतील त्यांना आम्ही माफ करणार नाही. कधीच सहन करणार नाही. मी मीडियाच्या माध्यमातून आवाहन करतो, जे काही आण्णावर खोटे गुन्हे दाखल झाले आहेत ते मागे घ्यावेत. या स्टंटबाजी करणाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत”, अशी मागणी वाल्मिक कराडचे वकील सिद्धेश्वर ठोंबरे यांनी केली.