मोठी बातमी! सरपंच हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा नेमका रोल काय? कोर्टात उद्या थेट युक्तिवाद
अखेर बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात उद्या मोठा दिवस उजाडणार आहे. कारण संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात महिनाभर तपासानंतर आज अखेर वाल्मिक कराडला या प्रकरणात आरोपी करण्यात आलं आहे. तसेच त्याच्यावर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर उद्या कोर्टात सीआयडी आणि एसआयटी वाल्मिक कराडचा संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात काय रोल होता? याबाबत युक्तिवाद करणार आहे. त्यामुळे उद्याचा कोर्टातला युक्तिवाद महत्त्वाचा असणार आहे.
बीड सरपंच हत्या प्रकरणात आज महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत. आरोपी वाल्मिक कराड याची कोठडी संपल्याने त्याला केज कोर्टात आज हजर करण्यात आलं. यावेळी आवरा नावाच्या पवनचक्कीच्या कंपनीकडून खंडणी मागितल्याच्या आरोप प्रकरणात आरोपी वाल्मिक कराड याला कोर्टाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावली. विशेष म्हणजे सीआयडीने या प्रकरणी 10 मुद्दे मांडत कराडच्या सीआयडी कोठडीची मागणी केली होती. पण कोर्टाने तेच तेच मुद्दे मांडल्याचं निरीक्षण नोंदवत वाल्मिक कराडला या प्रकरणात न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे वाल्मिक कराड याचा खंडणी प्रकरणात जामिनाचा मार्ग मोकळा झाला. पण यानंतर वाल्मिक कराड याचा बीडच्या केज तालुक्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात कनेक्शन असल्याचा आरोपाखाली कराडवर मकोका लावण्यात आल्याची माहिती समोर आली. एसआयटीने वाल्मिक कराडवर मोक्का लावल्याचं स्पष्ट केलं. यानंतर केज कोर्टाचा देखील निकाल समोर आला. केज कोर्टाने संतोष देशमुख हत्या प्रकरणात जी एसआयटी नेमली आहे त्या एसआयटीकडे वाल्मिक कराड याचा ताबा देण्याची विनंती मान्य केली. त्यामुळे वाल्मिक कराड याचा जेलमधील आजचा मुक्काम वाढला. वाल्मिक कराड याला बीड जेलमध्ये नेण्यात आल्याची माहिती आहे. तसेच त्याला उद्या पुन्हा कोर्टात हजर केलं जाणार आहे.
एसआयटीकडून मकोका कोर्टात अर्ज
वाल्मिक कराडची खंडणीच्या गुन्ह्यात सीआयडीला कोठडी आवश्यक होती. त्यासाठी सीआयडीने सर्वोतोपरी कोर्टात युक्तिवाद केला. पण सीआयडीला त्यात यश आलं नाही. वाल्मिक कराडला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर आरोपी वाल्मिक कराड याला संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी असून त्याच्यावर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचं एसआयटीकडून स्पष्ट करण्यात आलं. एसआयटीकडून या प्रकरणी मकोका कोर्टात अर्ज देखील करण्यात आला. एसआयटीने हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा ताबा मिळावा यासाठी विनंती केली. मकोका कोर्टाने आतापर्यंतच्या सर्व गोष्टी विचारत घेता वाल्मिक कराडला ताबा घेण्याची विनंती मान्य केली आहे.
वाल्मिक कराडला खंडणी प्रकरणात न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याने त्याला आता आधी तुरुंगात नेलं जाईल. त्यानंतर मकोका कोर्टाने जे प्रोडक्शन वॉरंट दिलं आहे ते वॉरंट तुरुंग प्रशासनाला दाखवून वाल्मिक कराडचा ताबा एसआयटीकडून घेतला जाईल. त्यानंतर वाल्मिक कराडला उद्या हत्येच्या प्रकरणात कोर्टात पुन्हा हजर केलं जाईल. यावेळी कोर्टात सीआयडी आणि एसआयटीकडून कोणते मुद्दे मांडले जातात, ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा नेमका काय संबंध आहे, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
कोर्टात उद्या महत्त्वाचा युक्तिवाद
वाल्मिक कराडला उद्या कोर्टात हजर केल्यानंतर महत्त्वाचा युक्तिवाद होणार आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा काय रोल होता, त्याला कोणत्या पुराव्यांच्या आधारे आरोपी करण्यात आलं आहे? याबाबत एसआयटीकडून उद्या कोर्टात माहिती देण्यात येण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे महिन्याभराच्या तपासानंतरही वाल्मिक कराडला हत्येच्या गुन्ह्यात आरोपी करण्यात आलेलं नव्हतं. पण आज खंडणीच्या गुन्ह्यात त्याला न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर एसआयटीने हत्येच्या गुन्ह्यात कराडला आरोपी बनवलं आणि त्याच्यावर मोक्का लावल्याचं स्पष्ट केलं. वाल्मिक कराडला हत्या प्रकरणात आरोपी केल्यामुळे मोककाचा गुन्हा त्याच्यावर आपोआप लागलेलं आहे.
मकोका गुन्हा दाखल करताना नेमक्या कोणकोणत्या गोष्टी विचारात घेतल्या गेल्या आहेत? हे देखील महत्त्वाचं आहे. या प्रकरणातील इतर आरोपींवर आधीच मकोका दाखल झाला आहे. त्यांचा रोल नेमका काय होता, त्यांनी कोणती भूमिका निभावली होती ते स्पष्ट झालेलं होतं. पण वाल्मिक कराडची भूमिका स्पष्ट झालेली नाही. त्याची भूमिका काय होती, संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा कट कोणी रचला, या प्रकरणातील आरोपींच्या संपर्कात वाल्मिक कराड होता का, संतोष देशमुख यांची हत्या करायची का हे कुणी ठरवलं, कशा पद्धतीने त्याची अंमलबजावणी करण्यात आली हे जवळपास उद्या कोर्टात स्पष्ट होईल. वाल्मिक कराडच्या पोलीस कोठडी मागताना नेमक्या किती दिवसांची कोठडी मागतिली जाते, नेमक्या कोणत्या आधारांवर कोठडी मागितली जाते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.