जायचं तरी कुठं? घरात पाणी, शहरात पाणी पण घशाला कोरड! हॉटेलात एका रात्रीचे 40 हजार, आयटी हब संकटात!
आयटी हब बंगळुरूमध्ये पाऊस आणि पूरस्थितीनं उग्र रुप धारण केलंय. नागरिकांच्या घरात पाणी शिरलंय. अशात हॉटेल्समध्येही किराया दुप्पट करण्यात आलाय. त्यातच हवामान विभागानं मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवलाय.
भारताची सिलिकॉन व्हॅली (Silicon Valley) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बंगळुरूत पावसानं (Bangalore rain) थैमान घातलंय. शहरातील बहुतांश घरात पाणी शिरलंय. कंपन्यांचे हाल बेहाल झालेत. जिथे-तिथे पाण्याचा शिरकाव (Flood situation) झाल्यानं पायाभूत सुविधा वाचवण्याचं मोठं आव्हान आहे. अनेक भाग आणि अपार्टमेंट जलमग्न झालेत. लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पावसामुळे काही ठिकाणी वीज गुल झालीय. सगळीकडे पाणी आहे, पण पिण्याच्या पाण्याअभावी नागरिकांचे हाल सुरु आहेत.
बंगळुरूत ज्या ज्या ठिकाणी पाणी तुंबलंय, तिथून ते हटवण्यास सुरुवात झाली आहे. पण जनजीवन विस्कळीत झालंय. आउटर रिंग रोड तसंच मरथाहल्ली आणि जवळपास भागात पाणी तुंबलेलंच आहे. घरांवरचं संकट पाहता हॉटेल व्यावसायिकांनीही दुप्पट भाडे केले आहेत.
हवामान विभागाने तर आज आणि उद्याही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवलाय.
मागील चार दिवसात बंगळुरूत 251.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्यापैकी 131.6 मिलीमीटर पाऊस रविवारी झाला.
अनेक नागरिक हॉटेलमध्ये राहणे पसंत करत आहेत. पण एका रात्रीचं भाडं 30 ते 40हजार रुपयापर्यंत झालंय. आधी ते 10 ते 20 एवढं होतं. तर OYO नेही खोल्यांचं भाडं वाढवलंय.
काही भागातलं पाणी उपसण्यात आलंय. इतरत्र मुक्कामी गेलेले लोक परतत आहेत. घरात काय काय नुकसान झालंय, त्याची पाहणी, साफ-सफाई सुरु आहे.
अनेक ठिकाणचे जनरेटर, वीजची बॅक अपची उपकरणं खराब झालीत. मोठ्या मशीन्समध्ये पाणी शिरल्याने त्या खराब झाल्यात.
येमालूरजवळील एका व्यक्तीने सांगितलं, सध्या परिस्थिती सुधारत आहे. पण तुंबलेलं पाणी काढण्यासाठी पंपांची कमतरता भासतेय. पाणी ओढणाऱ्या मोटर्सची मागणी वाढली आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले, पूरस्थितीवर उपाययोजनांसाठी केंद्र सरकारने विशेष अनुदान दिले पाहिजे.
राज्यात पूरस्थितीसाठी आधीच 600 कोटी रुपये देण्यात आले आहेत. त्यापैकी 300 कोटी रुपये फक्त बंगळुरूसाठी आहेत.