Bhandara fire | भंडारा दुर्घटनेची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करा- भाजप
चित्रा वाघ यांनी आज भंडारा दुर्घटनेतील मृत बाळाच्या पालकांची भोजापूर इथं जात भेट घेतली आणि बाळाच्या आई आणि कुटुंबियांचं सांत्वन केलं.
भंडारा: जिल्हा शासकीय रुग्णालयात शुक्रवारी लागलेल्या आगीत १० नवजात बालकांचा मृत्यू झालाय. त्यात ३ बाळांचा होरपळून तर 7 बाळांचा होरपळून मृत्यू झालाय. त्यावरुन आता भाजपनं राज्य सरकारला चांगलंच धारेवर धरलं आहे. भंडारा जिल्हा शासकीय रुग्णालयातील दुर्घटनेची चौकशी निवृत्त न्यायाधीशांच्या समितीद्वारे करावी अशी मागणी भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे. (BJP demands inquiry into Bhandara tragedy through retired judges)
चित्रा वाघ यांनी आज भंडारा दुर्घटनेतील मृत बाळाच्या पालकांची भोजापूर इथं जात भेट घेतली आणि बाळाच्या आई आणि कुटुंबियांचं सांत्वन केलं. भंडारा जिल्हा रुग्णालयाचं फायर ऑडिट करण्यात आलेलं ही धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे आरोग्य विभाग आणि राज्य सरकारवर जोरदार टीका सुरु आहे. आरोग्य विभागाच्या भोंगळ कारभारामुळेच 10 बाळांचा जीव गेल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्याच मुद्द्यावरुन अग्निशमन उपकरणासाठी मे महिन्यात पाठवलेला प्रस्ताव कुठे अडला, याची चौकशी करण्याची मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे.
बाळांच्या आईंचं समुपदेशन करण्याची मागणी
भंडारा दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या बाळांच्या आईंचं आणि त्यांच्या परिवाराचं समुपदेशन करण्याची मागणीही चित्रा वाघ यांनी केली आहे. भंडारा जिल्हा रुग्णालयातील दुर्घटनेनंतर सखोल चौकशीचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. त्यावर 10 बालकं दगावल्यानंतर सरकारला जाग का येते? अशा प्रकारे नवजात मुलं दगावली तर सरकारी रुग्णालयात प्रसूतीसाठी कोण येणार? असा सवालही वाघ यांनी विचारला आहे. तसंच या दुर्घटनेबाबत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. चित्रा वाघ यांनी आज भंडारा जिल्हा रुग्णालयालाही भेट दिली.
दोषींना कठोर शासन करणार- मुख्यमंत्री
भंडारा दुर्घटनेची सखोल चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. ते आज भंडारा दौऱ्यावरही जात आहेत. यावेळी ते भंडारा जिल्हा रुग्णालयाचीही पाहणी करणार आहेत. त्याचबरोबर दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या बाळांच्या आईंचीही ते भेट घेणार आहेत.
मुख्यमंत्र्यांचा भंडारा दौरा कसा असेल?
>> 10.10 वाजता मुख्यमंत्री वर्षा निवासस्थान येथून सांताक्रूझ विमानतळाकडे रवाना
>> 11.00 वाजता विमानाने नागपूरकडे रवाना होतील
>> 12.15 वाजता मुख्यमंत्री नागपूर विमानतळावर पोहोचतील
>> 12.20 वाजता मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने शहापूरकडे निघतील
>> 12.40 वाजता ते मौजा शहापूरला पोहोचतील
>> 12.55 वाजता मुख्यमंत्री भंडारा येथे पोहोचून नवजात बालकं गमावलेल्या भोजापूर येथील पालकांची भेट घेतील
>> 1.20 वाजता मुख्यमंत्री भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात पोहोचतील, तिथे ते पालकांची भेट घेतील आणि घटनास्थळाचं निरिक्षण करतील
संबंधित बातम्या:
आज मी तिथे नसलो, तरी आपण सर्व एकत्र आहोत, मुख्यमंत्र्यांकडून बाळांच्या मातांना धीर
BJP demands inquiry into Bhandara tragedy through retired judges