Bhandara | रखरखत्या उन्हात 65 वर्षीय महिलेचे उपोषणास्त्र, लाखनी तहसील कार्यालयासमोर तीन दिवसांपासून आंदोलन
भंडारा जिल्ह्यातील लिक्वीड प्लांटमुळं नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळं ते हटविण्यात यावं, या मागणीसाठी 65 वर्षीय महिला लाखनी तहसील कार्यालयासमोर उपोषण आंदोलन करत आहे. प्राण जाईल तरी चालेल न्याय पाहिजे, अशी या महिलेची मागणी आहे. नाकर्त्या प्रशासनामुळे रखरखत्या उन्हात उपोषणावर बसण्याची वेळ आली आहे.
तेजस मोहतुरे
भंडारा : कनेरी दगडी (Kaneri Dagdi) येथील लोकवस्तीत असलेल्या लघुउद्योग प्लांटमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्लांट हटवण्याच्या मागणीसाठी 65 वर्षीय लता शेंडे (Lata Shende) यांनी लाखनी तहसील कार्यालयासमोर सोमवारपासून बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. मात्र रात्री सात वाजताच्या सुमारास तहसीलदारांनी आपल्या दबावाचा वापर करून उपोषणकर्त्या महिलेचे पेंडाल हटविण्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. लाखनी तालुक्यातील कनेरी दगडी येथे कृषी विभागांतर्गत (आत्माच्या योजनेतून महाडीपी) लिक्विड प्लांट सुरू करण्यात आला आहे. सुगंधित गवतापासून तेल (Aromatic oil from fragrant grass) काढण्याची प्रक्रिया करण्यात येते. मात्र या प्रक्रियेदरम्यान उग्र स्वरूपाचा वास आणि धूर निघतो. त्यामुळे लोकवस्ती लगत असलेल्या या प्लांटमुळे नागरिकांना आरोग्याच्या प्रश्न भेडसावू लागला आहे.
तहसीलदारांनी नाकारली उपोषणाला परवानगी
कनेरी येथील हा प्लांट बंद करावा, या मागणीसाठी वर्षभरापासून उपोषणकर्त्या लता शेंडे यांनी प्रशासनाकडे पाठपुरवठा केला. मात्र प्रशासनाने यावर कुठलीही कारवाई केली नाही. लता शेंडे यांनी लाखनी तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसल्या आहेत. दरम्यान, लाखनीचे तहसीलदार महेश शितोळे यांनी उपोषणाची परवानगी दिली नाही, तरी सुद्धा महिला उपोषणावर बसल्याने कार्यालयाच्या पार्किंगला अडचण होते. हा मुद्दा समोर करून उपोषण करत या महिलेचे पेंडाल हटविले.
प्रकरण कृषी विभागाची संबंधित
सध्या जिल्ह्याचा पारा 40 डिग्री सेल्सिअस असताना लखलखत्या उन्हात विना पेंडालनेही महिला उपोषणला बसल्या आहेत. आता प्रकरण तडीस जाईपर्यंत हटणार नाही, अशी भूमिका उपोषण करता महिलेची आहे. त्यामुळे प्रशासन आता काय भूमिका घेते. याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. तर हा विषय कृषी विभागाशी संबंधित असल्याचा कारण देत तहसीलदारांनी आपली बाजू झटकल्याचे दिसत आहे. तर काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या मतदार संघात एका महिलेला खुल्या आकाशाखाली व लखलखत्या उन्हात उपोषणावर बसण्याची वेळ नाकर्त्या प्रशासनामुळे आली आहे. त्यामुळे न्याय कुणाकडे मागावं अशा प्रश्नही उपस्थित होत आहे.