सारस संवर्धनासाठी प्रशासन सरसावले, येथील तीन तालुक्यांत होणार क्लस्टर
सारस मित्रांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पक्षीमित्रांच्या माध्यमातून सारस पक्ष्यांचे संवर्धन करण्याचा प्रशासनाने निर्णय घेतला. त्याची अंमलबजावणी केली जात आहे.
तेजस मोहतुरे, भंडारा : दुर्मिळ सारस पक्षी संरक्षण व संवर्धनासाठी भंडारा प्रशासन सरसावले. प्रशासनाकडून सारस संभावित क्षेत्रात पाणथळ अधिवास पुनरुज्जीवन आराखडा तयार केला जाणार आहे. त्यात भंडारा, तुमसर, मोहाडी तालुक्यात क्लस्टर तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात सारस संरक्षण व संवर्धन समितीचे गठन करण्यात आले. अप्पर जिल्हाधिकारी व उपनसंरक्षकांच्या उपस्थित सभाही घेण्यात आली.
तुमसर तालुक्यातील वाहनी, उमरवाडा, बिनाकी, परसवाडा, पिंपरी चुनी, सिंदपुरी आणि मोहाडी तालुक्यातील रोहा, बेटाळा, घाटकुरोडा, कान्हळगाव, मुंढरी बु, मंडनगाव, मांडवी व दिघोरी आमगाव असे दोन क्लस्टर तयार करण्यात येणार आहेत.
मत्स्य संवर्धन विभागाने तुमसर मोहाडी व भंडारा या तीन तालुक्यात पक्ष्यांची शिकार होणार नाही. याबाबत कार्यशाळा आयोजित करण्यासंबंधीचे नियोजन आराखडा समितीला सादर करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या सारस संभाव्य क्षेत्रातील सर्व तलावांचे पुनरुज्जीवन केले जाणार आहे.
सारस संभावित सर्व क्षेत्राच्या सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यात पक्षांना प्रवृत्त करण्यासाठी योजना तयार करण्यात येणार आहेत. सारस संभावित क्षेत्रातील ग्रामपंचायतस्तरीय जैवविविधता व्यवस्थापन समितीचे पुनर्गठण करून त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
तसेच सारस मित्रांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पक्षीमित्रांच्या माध्यमातून सारस पक्ष्यांचे संवर्धन करण्याचा प्रशासनाने निर्णय घेतला. त्याची अंमलबजावणी केली जात आहे.
सारस हा पक्षी राज्यत फक्त भंडारा, गोंदिया जिल्ह्यात दिसतो. भंडारा, गोंदिया आणि बालाघाट जिल्ह्यात या पक्ष्यांची गणना करण्यात आली. सुमारे 50 पक्षीप्रेमींनी यात सहभाग घेतला होता.
सगळ्यात मोठी उड्डाण भरणारे असे हे सारस पक्षी आहेत. हे पक्षी जोड्यानं राहतात. एकाचा मृत्यू झाल्यास दुसराही प्राण त्यागतो. तीन वर्षांपूर्वी गोंदिया जिल्ह्यात 38 ते 40 सारस पक्ष्यांची गणना झाली होती.
बालाघाट जिल्ह्यात 48 ते 50 सारस पक्षी मोजले गेले होते. शेतातील किडे खाण्याचं काम सारस पक्षी करतो. त्यामुळं शेतकऱ्यांना या सारस पक्ष्यांचा फायदा होतो.