Bhandara SP transferred : आमदार नरेंद्र भोंडेकर आणि एसपींमधील वाद, भंडारा पोलीस अधीक्षक यांची तडकाफडकी बदली
पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांची बदली झाली. आता नवे पोलीस अधीक्षक कोण याची चर्चा सुरू झाली. नागपूरचे डीसीपी लोहित मतानी यांचं नाव भंडारा पोलीस अधीक्षक म्हणून पुढं असल्याची माहिती आहे.

भंडारा : भंडाऱ्याचे पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांची आज तडकाफडकी बदली करण्यात आली. त्या संदर्भाचा आदेशही निघालेला आहे. विशेष म्हणजे एका शाळेच्या प्रकरणात (school case) शाळा आणि आमदार भोंडेकर यांच्या झालेल्या वादात पोलीस अधीक्षक यांनी आमदार भोंडेकर यांच्यावर विविध कलमाद्वारे गुन्हा नोंद (case registered) केला होता. यानंतर पोलीस अधीक्षक आणि आमदार यांचा वाद पेटला होता. दरम्यान, पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांची बदलीची चर्चा रंगली असताना आज अखेर वसंत जाधव (Vasant Jadhav) यांची बदली झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आलेलं आहे.
काय होता आमदार व एसपीमधील वाद?
बेल्याला महर्षी विद्या मंदिर आहे. पालकांनी विद्या मंदिरने अधिकची फीवाढ केल्याची तक्रार आमदार या नात्याने नरेंद्र भोंडेकर यांच्याकडं केली. नरेंद्र भोंडेकर यांनी महर्षी विद्या मंदिरला याबाबत सुनावले. तेव्हा महर्षी विद्या मंदिर प्रशासनाने आमदारांच्या विरोधात तक्रार दिली. या प्रकरणी पोलीस अधीक्षकांनी आमदारांच्या विरोधात गुन्हे नोंदविले. त्यामुळं नरेंद्र भोंडेकर भडकले. तेव्हापासून पोलीस अधीक्षक आणि आमदार भोंडेकर यांच्यात वाद निर्माण झाले.
भोंडेकरांनी केली होती एसपींच्या निलंबनाची मागणी
बीडीओवर रेतीतस्कारांनी हल्ला केला होता. पोलीस अधीक्षक करतात काय, असा सवाल आमदार भोंडेकर यांनी केला होता. त्यावेळी भोंडेकर यांनी पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांना निलंबित करण्याची मागणी केली होती. आता भोंडेकर सत्तेत आले. त्यामुळं ही कारवाई झाल्याचं बोललं जातं. पण, भोंडेकर म्हणतात, यात सुडाचा कुठलाही भाग नाही. पोलीस विभागाची कारवाई आहे. महाविकास आघाडीच्या काळात प्रस्तावित होती. आता आदेश निघाला आहे.




नवे पोलीस अधीक्षक कोण?
पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांची बदली झाली. आता नवे पोलीस अधीक्षक कोण याची चर्चा सुरू झाली. नागपूरचे डीसीपी लोहित मतानी यांचं नाव भंडारा पोलीस अधीक्षक म्हणून पुढं असल्याची माहिती आहे. नवे पोलीस अधीक्षक कोण येणार याकडं लक्ष लागलं आहे. सत्ता बदलाचे परिणाम असल्याचं बोललं जात. नरेंद्र भोंडेकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झालेत. नरेंद्र भोंडेकर यांचा वाढदिवस गुवाहाटीत साजरा केला होता.