तेजस मोहतुरे
भंडारा : जिल्ह्यात मोहाडी (Mohadi) नगरपंचायतीवर जिल्हावासीयांचे विशेष लक्ष होते. भाजपच्या अंतर्गत कलहामुळे एका गटाने दोन पाऊल मागे घेत छाया डेकाटे यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ टाकली. तर उपाध्यक्षपदी भाजयुमो जिल्हा सचिव शैलेश गभने यांची वर्णी लागली. ही संपूर्ण निवडणूक बिनविरोध झाली. या निवडणुकीत (Election) भाजपचे एका गटातील चार नगरसेवक (Corporator) विजयी मिरवणुकीत अनुपस्थित होते. त्यामुळं पुन्हा एकदा अंतर्गत कलह वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही. येणाऱ्या 22 फेब्रुवारी रोजी स्थायी समिती, विषय समिती सभापती व स्वीकृत सदस्यांची निवडणूक होणार आहे. स्वीकृत सदस्य कोण यासाठी भाजपच्या स्थानिक व्यवसायिक दोन बड्या नेत्यांचे नाव समोर येत आहे. भंडारा जिल्ह्यात तीन नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपने दोन नगरपंचायतीवर आपली सत्ता प्रस्थापीत केली, तर एका नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांनी गठबंधन करुन आपली सत्ता प्रस्थापीत केली. जिल्ह्यात नाना पटोले यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
लाखांदुरात भाजपने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवले. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या तालुक्यातील केंद्रस्थानी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला मात्र सत्ता काबीज करता आली नाही. लखांदूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी भाजपच्या नेते विनोद ठाकरे यांच्या गळ्यात माळ पाडली. तर उपाध्यक्षपदी अपक्ष उमेदवार प्रल्हाद देशमुख यांची वर्णी लागली.
लाखनी नगरपंचायतीत काँग्रेस आणि राष्ट्रावादी यांची आघाडी झाली. राष्ट्रवादीला नगराध्यक्ष पद तर काँग्रेसला नगर उपाध्यक्ष पद दिले गेले. नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या त्रिवेणी पोहरकर तर नगर उपाध्यक्षपदी काँग्रेसचे प्रदीप तितरमारे यांची निवड झाली. गोंदिया जिल्ह्याच्या मोरगाव अर्जुनीत राष्ट्रवादी आणि भाजप युती झाली. त्याचे पडसाद भंडाऱ्यात उतरणार याची चर्चा होती. पण, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या आघाडीने लाखनीत सत्ता स्थापन केली आहे.