Video – भंडाऱ्याच्या शिवसेना आमदारांची नितीन गडकरींना साद, भाजप-शिवसेना युतीचे जुने दिवस येतील का?
भंडाऱ्याचे शिवसेना आमदार नरेंद्र भोंडेकर यांचे मन काही महाविकास आघाडीत करमेनासे झाले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी काल भंडाऱ्यात आले होते. तेव्हा गडकरी यांना भाजप-शिवसेना युतीचे जुने दिवस आणण्याची विनंती जाहीर सभेतच केली.
तेजस मोहतुरे
भंडारा : भंडाऱ्याचे शिवसेना आमदार नरेंद्र भोंडेकर (MLA Narendra Bhondekar) यांना महाविकास आघाडीत करमेनासे झाले आहे. नरेंद्र भोंडेकर यांनी चक्क केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांना भाजप-सेना युतीचे जुने दिवस आणण्याची विनंती जाहीर सभेत केली. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय धुरिणांच्या भुवय्या उंचावल्या गेल्यात. शिवसेना नेत्याचे मन महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सहभागी राहण्यात आता काही राहिला नाही, असे दिसते. भंडारा शहरातून जाणाऱ्या 421 कोटी रुपये किमतीच्या 6 पदरी बायपास रस्त्याच्या निर्माण कार्याचे भूमिपूजन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते काल करण्यात आले. कार्यक्रमाप्रसंगी नरेंद्र भोंडेकर यांनी जाहीर सभेत ही इच्छा प्रकट केली. गडकरी साहेबच भाजप व शिवसेनेचे जुने दिवस आणतील, असा विश्वास ही भोंडेकर यांनी जाहीर सभेत बोलून दाखविला.
गडकरींवर उधळली स्तुतीसुमने
नरेंद्र भोंडेकर म्हणाले, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे लोकनेते आहेत. देशात त्यांच वेगळं नाव आहे. पक्षपात सोडून सर्व हित जपणारे नेतृत्व म्हणजे गडकरी आहेत. गडकरी लोकांच्या कामासाठी धावतात. अशी स्तुतीसुमने भोंडेकर यांनी गडकरी यांच्यावर जाहीर सभेत उधळली. जे काम घेऊन मी त्यांच्याकडे गेलो. त्याला गडकरी साहेबांनी नकार दिला नाही, असंही त्यांनी सांगितलं. नरेंद्र भोंडेकर अपक्ष निवडणूक लढून आमदार झाले. ते शिवसेना पदाधिकारी आहेत. त्यामुळं शिवसेनेचे आमदार आहेत.
पाहा व्हिडीओ
शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी नितीन गडकरींवर उधळली स्तुतीसुमने pic.twitter.com/FDlb8bgLh0
— Govind Hatwar (@GovindHatwar) March 4, 2022
भाजप-शिवसेना पुन्हा युती होणार?
शिवसेनेने आपल्या परंपरागत मित्राला दूर करता शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी मिळून महाविकास आघाडी तयार करत सत्ता स्थापन केली. या महाविकास आघाडीला दोन वर्षे पूर्ण झालीत. या दोन वर्षात आघाडीत अनेक वाद विवाद सुरू झाले आहेत. त्यात शिवसेना आमदारांची आपल्याला निधी कमी मिळत असल्याची ओरड सुरू झाली होती. त्याचा हा कदाचित परिणाम असेल. पण, भोंडेकर यांनी भाजपसोबत पुन्हा दिलजमाई व्हावी अशी आशा व्यक्त केली आहे. त्यामुळे भविष्यात भाजप-शिवसेना युती पुन्हा होणार का गडकरी यासाठी पुढाकार घेणार का, अशी चर्चा सुरू झाली.