भंडाऱ्यात आणखी एका राष्ट्रवादीच्या नेत्याविरोधात गुन्हा, दहावीतील विद्यार्थिनीचा विनयभंग, माजी जि. प. अध्यक्ष अडचणीत
एका वसतिगृहाचा संचालक असलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्याविरोधात दहावीतील विद्यार्थिनीने विनयभंगाची तक्रार दाखल केली. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष असलेल्या या नेत्याविरोधात आंधळगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तेजस मोहतुरे
भंडारा : आंधळगावचे पोलीस निरीक्षक सुरेश मट्टामी ( Police Inspector Suresh Mattami) यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी दहावीत शिकते. भंडारा शहरातील महिला वसतिगृहामध्ये राहते. 25 फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या सुमारास माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुमेध श्यामकुवर (Former Zilla Parishad President Sumedh Shyamkumar) मुलीच्या घरी गेले. मुलीला वसतिगृहात (girl in hostel ) पोहचवून देतो म्हणून सांगितलं. वडिलांनी विश्वासानं मुलीला सोबत पाठविलं. कारने मुलीला घेऊन जात होता. मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार, काही अंतर गेल्यावर आरोपीनं कार थांबविली. ते ठिकाण निर्मनुष्य होते. सुमेधने मुलीवर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. पण, तिने त्याच्यापासून स्वतःला सावरले. पीडित मुलगी प्रचंड घाबरली होती. तिला काय करावे काही सूचत नव्हते.
बाल अत्याचार कायद्यांतर्गत गुन्हा
वसतिगृहात गेल्यानंतर तिने एका मैत्रिणीला घडलेला प्रकार सांगितला. मैत्रिणीनं मुलीच्या वडिलांना या प्रकरणाची माहिती दिली. वडिलांनी आंधळगाव पोलीस ठाण्यात सुमेध श्यामकुवर याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल, असं आश्वासन पोलीस निरीक्षक सुरेश मट्ट्मी यांनी सांगितलं.
राष्ट्रवादीचा नेता माजी जि. प. अध्यक्ष
आंधळगाव पोलिसांनी कलम 354, पास्को -8 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सुमेध श्यामकुवर हा भंडारा जिल्हा परिषदेचा माजी अध्यक्ष आहे. तो कोंढी (जवाहरनगर) येथे राहतो. तो राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता आहे. विशेष म्हणजे अश्लील शिवीगाळ प्रकरणी मोहाडीचे राष्ट्रवादीचे आमदार राजू कारेमोरे हे काही दिवसांपूर्वी चर्चेत आले होते. कारेमोरे यांनी मोहाडी ठाण्यात जाऊन पोलिसांनाचं शिविगाळ केली होती. आता राष्ट्रवादीच्या दुसऱ्या नेत्यावर विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय.