कचरा तुमची डोकेदुखी ठरतोय का?, या नगरपंचायतीने केला हा यशस्वी प्रयोग
कचरागाडी येत नाही. अशा तक्रारी लोकं करत होते. त्यावर मोहाडी नगरपंचायतीनं यशस्वी प्रयोग केला.
भंडारा : ग्रामीण भागात घरातील कचरा खात्यावर फेकला जातो. पण, शहरात हे शक्य नाही. घरोघरी ओला आणि सुका कचरा जमा होतो. तो नगरपंचायत किंवा नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी नेला नाही. तर कचरा घरातच ठेवण्याची वेळ येते. शहरात अशा ओल्या कचऱ्याला दुर्गंधी सुटते. त्यामुळे नगरपंचायत किंवा नगरपालिका क्षेत्रात कचरा घेऊन जाणाऱ्या गाडी ठेवण्यात आल्या आहेत. पण, कचरा नेणाऱ्या गाड्या आल्या नाही, तर लोकांची पंचाईत होत होती. कचरागाडी येत नाही. अशा तक्रारी लोकं करत होते. त्यावर मोहाडी नगरपंचायतीनं यशस्वी प्रयोग केला. त्यामुळे घरातील कचऱ्याची आता व्यवस्थित विल्हेवाट लावली जात आहे.
कचरा घेऊन जाणे बंधनकारक
जिल्ह्याच्या मोहाडी नगरपंचायतीने डिजिटलायजेशनच्या बाबतीत एक पाउल पुढे टाकलं. कचरा घ्यायला गाडी आली की नाही याची नोंद घेण्यासाठी चक्क घराला क्यू आर कोड लावले. कचरागाडी वाल्याला अॅपद्वारे नोंद घेण्यास भाग पाडण्यात येणार आहे. त्याची पारदर्शक नोंद घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे क्यू आर कोड लागल्याने कचरागाडीला कचरा घेऊन जाणे बंधनकारक झाले आहे.
कचरा हा विषय नगरपालिका आणि त्या नगरपालिका क्षेत्रातील रहिवासी यांच्यासाठी नेहमीच डोकेदुखीचा विषय. कचरागाडीवाला वेळेत येऊन कचरा नेत नसल्याची तक्रारींचा ढिग होऊ लागला होता. मोहाडी नगरपंचायत ही या समस्येने त्रस्त झाली होती.
क्यू आर कोड स्कॅन करणे सक्तीचे
मोहाडी नगर पंचायतीने नामी शक्कल लढवली. नगरपालिका क्षेत्रातील सर्व घराला क्यू आर कोड लावला. कचरा गाडी वाल्याला क्यू आर कोड रीडर स्कॅनर देण्यात आले. ज्या घरातून कचरा घेतला त्या घराला लागलेल्या क्यू आर कोड स्कॅन करण्याची सक्तीच करून टाकली. अशी माहिती नगरपंचायतीचे उपाध्यक्ष सचिन गायधने यांनी दिली.
क्यू आर कोड लागल्याने कचरागाडी वाल्याला प्रत्येक घराचा कचरा घेऊन जाणे बंधनकारक झाले आहे. त्यामुळे कचरा घ्यायला गाडी आली की नाही याची सरळ नोंद होत आहे. आता घरातील कचरा दिवसेंदिवस पडला राहत नाही. त्यामुळे क्षेत्रातील नागरिकही समाधानी झाले आहेत. असं सुषमा साखरवाडे आणि संगीता गायकवाड यांनी सांगितलं.
मोहाडी नगर पंचायतीच्या डिजिटल प्रयोगाची चर्चा जिल्ह्यात होऊ लागली. इतर नगरपालिका क्षेत्रात क्यू आर कोड पध्दत लागू करण्याची मागणी जोर धरत आहे. प्रयोग यशस्वी होत आहे. त्यामुळे या प्रयोगाची इतर ठिकाणी मागणी होऊ लागली आहे.