तेजस मोहतुरे
भंडारा : नागपुरात सासू-सुनेच्या वादातून सुनेने विष प्राशन केले. चिमुकल्याला पाजले. यात विष प्राशनाने दीड वर्षांचा मुलगा दगावला. तर भंडाऱ्यात पती-पत्नीच्या वादातून दोघांनीही स्वतःला जाळून घेतले. ही घटना कारधा येथे मध्यरात्री घडली. या घटनेत दोघांचाही मृत्यू झाला. पण, तीन वर्षांचा मुलगा बचावला. कारध्यातील महेंद्र सिंगाडे (38) आणि त्यांची पत्नी मेघा (30) यांच्यात शनिवारी मध्यरात्री वाद झाला. हे भांडण खूपच विकोपाला गेले. तुही नको नि मीही नाही, असं म्हणून महेंद्रने आधी स्वतःवर रॉकेल ओतले. नंतर पत्नी मेघावर रॉकेल ओतले आणि पेटवून घेतले.
घरगुती भांडणाच्या कारणातून महेंद्रने पत्नी मेघासह आपल्या 3 वर्षीय मुलाला जाळून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. यामध्ये पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. तर 3 वर्षीय चिमुकल्यावरती भंडारा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती कारधा पोलिसांना देण्यात आली. पोलीस घटनास्थळी पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनाकरिता पाठविण्यात आले.
तर दुसरीकडं, रामटेक तालुक्यात बनपुरी नावाचं गाव आहे. या गावात प्रणाली (वय 22) रामकृष्ण धावडे या महिलेची तिच्या सासूशी भांडण झाले. त्यानंतर घरचे लोकं शेतावर कामासाठी गेले. प्रणालीने पोटच्या पोराला विष पाजले. त्यानंतर स्वतःही विष प्राशन केले. यात चिमुकल्या वेदांतचा मृत्यू झाला. प्रणालीला शेजाऱ्यांनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तात्काळ उपचार मिळाल्याने प्रणालीचा जीव वाचविण्यात डॉक्टरांना यश आले. रामटेक येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.