मुख्यमंत्री साहेब आता शेती परवडत नाही, वाईन विक्रीची परवानगी द्या; भंडाऱ्याच्या शेतकऱ्याचे उद्धव ठाकरेंना पत्र
भंडाऱ्यामधून एक अजब प्रकार समोर आला आहे. भंडारा जिल्ह्यातील एक शेतकऱ्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले असून, त्यात त्याने आपल्याला वाईन विकायला परवानगी मिळावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
भंडारा : भंडाऱ्यामधून (Bhandara) एक अजब प्रकार समोर आला आहे. भंडारा जिल्ह्यातील एक शेतकऱ्याने (Farmers) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray) यांना एक पत्र लिहिले असून, त्यात त्याने आपल्याला वाईन विकायला परवानगी मिळावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. मुख्यमंत्री साहेब गेल्या अनेक वर्षांपासून शेती तोट्यात आहे. शेती परवडत नाही, त्यामुळे तुम्ही जशी किराणा दुकानात वाईन विक्रीला परवानगी दिली तशी आम्हा शेतकऱ्यांनाही द्यावी असे या शेतकऱ्याने पत्रात म्हटले आहे. शेतकऱ्याचे हे पत्र जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरले आहे. जयगुनाथ गाढवे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. जयगुनाथ हे भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातल्या निलज बु. गावातील रहिवासी आहे. निलज बु. परिसरात ऑक्टोबर 2021 ला चक्रीवादळ आले होते. या चक्रीवादळात जयगुनाथ यांच्यासह गावातील अनेक शेतकऱ्यांची धानाची शेती भुईसपाट झाली होती. पंचनामे होऊन देखील मदत न मिळाल्याने आता थेट या शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांनाच पत्र लिहिले आहे. त्यात त्याने वाईन विक्रीची परवानगी मागितली आहे.
काय आहे गाढवे यांची मागणी
गावात चक्रीवादळ आले, चक्रीवादळात पिकाचे प्रचंड नुकसान झाले. नुकसानीचे पंचनामे देखील करण्यात आले. मात्र अद्यापही नुकसानभरपाई मिळालेली नाही. त्यातच शासनाने मागील वर्षापासून धान उत्पादक शेतकऱ्यांना मिळणारे बोनस बंद केले आहे. यामुळे शेतकरी आडचणीत सापडला आहे. दुसरीकडे शेतासाठी होणारा खर्च देखील पिकांमधून वसूल होत नाही. अशा परिस्थितीमध्ये मुलांना लागणारी फी, कुटुंबाच्या आरोग्यासाठी लागणारा खर्च कुठून आणायचा असे सवाल या पत्रात गाढवे यांनी मुख्यमंत्र्यांना विचारले आहेत. सोबतच शेतकऱ्यांना वाईन व्रिकीची परवानगी द्यावी अशी मागणी देखील त्यांनी या पत्राद्वारे केली आहे.
दुकानदारांना परवानगी मग आम्हाला का नाही?
गाढवे यांनी मुख्यमंत्र्यांना हे पत्र स्पीड पोस्टने पाठवले आहे. जर किराणा दुकानदारांना वाईन विक्रीची परवानगी मिळू शकते तर आम्हाला का नाही? असा सवाल या शेतकऱ्यांने पत्रातून उपस्थित केला आहे. आता शेती परवडत नाही. कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे, त्यामुळे मला मुख्यमंत्री साहेबांनी वाईन विक्रीची परवानी द्यावी अशी मागणी त्यांनी या पत्रातून केली आहे. त्यांच्या या पत्राची जिल्ह्यात जोरदार चर्चा होत आहे.
सबंधित बातम्या
वारंवार हॉर्न वाजवणाऱ्या महिलेला मधलं बोट दाखवलं, पुण्यात इंजिनिअरला बेदम मारहाण
निफाड परिसरात रिमझिम पाऊस, वातावरणात पसरला गारवा; अनेक पिकांना फटका बसण्याची शक्यता