केंद्रीय मंत्री भारती पवारांकडून कोल्हापुरात अधिकाऱ्यांची खरडपट्टी; रुग्ण हेळसांडीबद्दल धरले धारेवर…!
रुग्णांसाठी नागरिकांना आंदोलन करण्याची वेळ येत असेल, तर मी सहन करणार नाही, असा इशारा केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी अधिकाऱ्यांना दिला.
कोल्हापूरः केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी रविवारी कोल्हपुरात अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली. कोरोना रुग्णांच्या हेडळसांडीबद्दल त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. एकीकडे पंतप्रधान पोटतिकडीने काळजी घेण्याचे आवाहन करत आहेत. दुसरीकडे कोल्हापुरात गलथान कारभार सुरू आहे. याबद्दल त्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत अधिकाऱ्यांना तात्काळ काम करण्याची समज दिली. मंत्री महोदयाचा रुद्रावतार पाहून अधिकाऱ्यांची अक्षरशः भंबेरी उडाली.
काय आहे प्रकरण?
कोल्हापूरमध्ये कोरोना रुग्णांची हेळसांड सुरू आहे. अनेक ठिकाणी योग्य ते उपचार मिळत नाहीत. तर कुठे कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. यामुळे कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी नागरिकांनी चक्क रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागत आहे. याबाबतच्या तक्रारी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांच्याकडे आल्या होत्या. कोल्हापूर दौऱ्यात त्यांनी या तक्रारीच्या मुळाशी जाण्यासाठी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. नेमका काय प्रश्न आहे, रुग्णांची हेळसांड का, असे म्हणत त्यांची बोलती बंद केली. रुग्णांसाठी नागरिकांना आंदोलन करण्याची वेळ येत असेल, तर मी सहन करणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
दिल्लीचा दिला दाखला
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री यांना शल्य चिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव दिसला. ते पाहून त्यांच्या संतापाचा पारा चढला. निधी नसेल, कर्मचारी नाहीत, नेमके काय आहे ते सांगा. कर्मचारी नसतील तर कंत्राटी पद्धतीने पदे भरा. मात्र, मला रुग्णांची हेळसांड झालेली चालणार नाही, अशा शब्दांत खरडपट्टी काढली. त्यांना दिल्लीच्या अधिकाऱ्यांचे उदाहरण देत कामात चोखपणा आणण्याच्या आणि सुधारणा करण्याच्याही सूचना दिल्या.
अंबाबाईला साकडे
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी कोल्हापुरात अंबाबाईचे दर्शन घेतले. कोरोनाचे संकट दूर व्हावे, असे साकडे घातले. पंतप्रधानांनी 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाची 3 जानेवारीपासून सुरुवात करणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे एक सुरक्षाकवच मिळाल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली. कोरोनाकाळात केंद्राने कोल्हापूरला भरीव मदत दिली. अजूनही कोरोना संकट टळलेले नाही. ओमिक्रॉनबाबत काळजी घ्या. मात्र, नाहक भीती बाळगू नका, असे आवाहनही त्यांनी केले.
तर केंद्र सरकार लक्ष घालेल
कोरोना साहित्य खरेदीत घोटाळा झाला असेल, तर राज्य सरकारने दखल घ्यायला हवी. 3 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या लसीकरणाबाबत केंद्र सरकार लवकरच गाईड लाईन्स जाहीर करणार आहे, असे सुतोवाच केंद्रीय मंत्री भारती पवार यांनी केले. यावेळी त्यांनी राज्यात नेमके काय चालले आहे, याचा प्रश्न पडत असल्याचे म्हटले. विद्यार्थाना मोठ्या त्रासाला समोर जावे लागतेय. ब्लॅक लिस्टमध्ये असणाऱ्या कंपन्यांवर परीक्षांची जबादारी दिली जातेय. राज्य सरकार अनेक प्रश्नांबाबत गंभीर नाही. फक्त घोषणा सुरू आहे. तक्रारींचे प्रमाण वाढले, विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ लागले, तर केंद्र सरकार नक्की लक्ष घालेल, असे आश्वासन त्यांनी दिले.
इतर बातम्याः