आजोबा-वडील महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, आता तिसरी पिढीदेखील मैदानात, अशोक चव्हाण यांच्या लेकीला भाजपकडून मोठी संधी

| Updated on: Oct 20, 2024 | 5:13 PM

भाजप खासदार अशोक चव्हाण यांच्या लेकीला विधानसभा निवडणुकीचं तिकीट जाहीर झालं आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने अशोक चव्हाण यांचा कन्या श्रीजया चव्हाण यांचा सक्रिय राजकारणात प्रत्यक्ष सहभाग होणार आहे.

आजोबा-वडील महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, आता तिसरी पिढीदेखील मैदानात, अशोक चव्हाण यांच्या लेकीला भाजपकडून मोठी संधी
अशोक चव्हाण यांच्या लेकीला भाजपकडून मोठी संधी
Follow us on

भाजपकडून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली. या यादीत अनेक विद्यमान आमदारांना धक्का देण्यात आला आहे. तर काही ठिकाणी नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. भाजपकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाल्यानंतर दोन जागांची चर्चा आहे. एक म्हणजे कल्याण पूर्व विधानसभा आणि दुसरी म्हणजे भोकर विधानसभा मतदारसंघ. या दोन्ही ठिकाणी भाजप नेत्यांच्या नातेवाईकांना तिकीट जाहीर झालं आहे. विशेष म्हणजे दोन्ही ठिकाणी महिलांना उमेदवारी जाहीर झाली आहे. या दोन्ही जागांकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष असणार आहे. कारण कल्याण पूर्वेत विद्यमान आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर भोकर विधानसभा मतदारसंघासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

अशोक चव्हाण हे महाराष्ट्रातील मोठे नेते आहेत. त्यांनी काही महिन्यांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला. अशोक चव्हाण यांची नांदेडमध्ये ताकद आहे. भाजपकडून चव्हाण यांना राज्यसभेची खासदारकी देण्यात आली आहे. यानंतर त्यांना खूश करण्यासाठी आता पक्षाने त्यांच्या कन्या श्रीजया चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे. याशिवाय अशोक चव्हाण यांची भोकर मतदारसंघात ताकद आहे. ते स्वत: या मतदारसंघातून दोन वेळा जिंकून आले आहेत. याशिवाय त्यांच्या पत्नी अमिता चव्हाण या 2014 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तिकीटावर जिंकून आल्या आहेत. अशोक चव्हाण यांना राजकीय वारसा आहे. तोच वारसा आता त्यांच्या कन्या श्रीजया चव्हाण या पुढे नेणार आहेत.

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेतून राजकारणाच्या मैदानात एन्ट्री

श्रीजया चव्हाण यांनी काही महिन्यांपूर्वीच भोकर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे संकेत दिले होते. श्रीजया संपूर्ण मतदारसंघात वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावत होते. त्या राजकारणात प्रचंड सक्रिय देखील झाल्या होत्या. त्यामुळे श्रीजया यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर होईल, अशी याआधीच नांदेडच्या राजकीय वर्तुळात चर्चा होती. श्रीजया चव्हाण या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्या होत्या. त्याचवेळी श्रीजया यांच्या खऱ्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात झाली आहे.

हे सुद्धा वाचा

श्रीजया यांचे वडील अशोक चव्हाण हे स्वत: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले आहेत, तसेच त्यांचे आजोबा शंकरराव चव्हाण हे देखील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. त्यानंतर आता चव्हाण कुटुंबातील आता ही तिसरी पिढी महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय होताना दिसत आहे. या निवडणुकीत श्रीजया जिंकून आल्या तर त्यांचं राजकीय भवितव्यदेखील उज्ज्वल ठरण्याची शक्यता आहे. अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर ही पहिली विधानसभा निवडणूक आहे. त्यामुळे भोकर विधानसभा मतदारसंघात श्रीजया यांच्या लढतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असणार आहे.