जाधवांनी आधी शब्द मागे घेतले, अंगविक्षेपही, तरीही भाजप संतप्त, शेवटी बिनशर्त माफी, संपूर्ण घटनाक्रम

| Updated on: Dec 22, 2021 | 3:21 PM

भास्कर जाधव यांनी विभानसभेच्या अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल केल्यावर गदारोळ उठला. विरोधी पक्षनेत्यांनी भास्कर जाधव यांच्या निलंबनाची मागणी केली तसेच सभागृह तहकूब करण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला.

जाधवांनी आधी शब्द मागे घेतले, अंगविक्षेपही, तरीही भाजप संतप्त, शेवटी बिनशर्त माफी, संपूर्ण घटनाक्रम
विधानसभेत भास्कर जाधवांच्या वक्तव्यावरून गदारोळ
Follow us on

मुंबईः विधानसभा अधिवेशनात आज विधानसभा सदस्य भास्कर जाधव यांनी एका विषयावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल केली. तसेच बोलताना पंतप्रधानांसारखा अंगविक्षेपही केला. यावरून भाजपचे नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मोठा आक्षेप घेतला. भास्कर जाधव यांनी एक तर जाहीर माफी मागावी नाही तर त्यांचं तत्काळ निलंबन करावं, या मागणीवर विरोधकांनी घोषणाबाजी केली. अन्यथा सभागृह स्थगित करण्याची मागणी त्यांनी केली. त्यानंतर भास्कर जाधव यांनी उभे राहून आपले शब्द आणि अंगविक्षेप मागे घेतले तरीही भाजपचा संताप आणि कोलाहल सुरुच होता.

विधानसभेत नेमकं काय घडलं?

– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल करत विधानसभा सदस्य भास्कर जाधव म्हणाले, ‘2014 साली देशाचे पंतप्रधान होण्यापूर्वी नरेंद्र मोदी म्हणाले, ‘काला धन लाने का है की नही… लाने का… लाने का है तो कहाँ रखने का.. युही रखने का…’ अशा प्रकारे नक्कल करताना भास्कर जाधव यांनी अंगविक्षेप केला.
– भास्कर जाधव यांच्या नकलेनंतर विरोधकांनी सभागृहात एकच गोंधळ सुरु केला. भास्कर जाधव यांनी आधी जाहीर माफी मागावी, वक्तव्य मागे घ्यावं, अंगविक्षेप मागे घ्यावा. देशाच्या पंतप्रधानांची सभागृहात अशी नक्कल करणं हे सभागृहासाठी अत्यंत लाजिरवाणं असं हे कृत्य आहे, अशी आक्रमक मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.
– दरम्यान जयंत पाटील यांनी या सर्व प्रकरणात मध्यस्थी करत म्हटले की, सभागृहातील विषय संपल्यानंतर या प्रकरणाचा रेकॉर्ड तपासला जाईल आणि नंतर त्यावर काय कारवाई करता येईल, हे पाहिले जाईल. मात्र विरोधक यानंतरही शांत झाले नाहीत. सभागृहात घोषणाबाजी सुरुच होती.
– भास्कर जाधव यांनी केलेल्या वक्तव्यावर मी वेगळा हक्कभंग प्रस्ताव आणेन, असं फडणवीस म्हणाले, मात्र पंतप्रधानांची नक्कल करण्याचे हे ठिकाण आहे का? हे सहन केलं जाणार नाही. अध्यक्ष महोदय तुम्ही तरी हे का सहन करतायत? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला. भास्कर जाधव यांना सभागृहात बसण्याची परवानगी देऊ नये, अशी मागणी फडवणीस यांनी केली.

भास्कर जाधवांनी मागितली बिनशर्त माफी

या सर्व गदारोळात भास्कर जाधव यांनी उभे राहून सभागृहाची जाहीर माफी मागितली. पंतप्रधानांची नक्कल करताना मी बोललेले शब्द मागे घेतो तसेच मी केलेला अंगविक्षेपही मागे घेतो, असे वक्तव्य करत त्यांनी सभागृहाची बिनशर्त माफी मागत असल्याचे म्हटले. त्यानंतर विभानसभेचे कामकाज पुन्हा सुरु झाले.

इतर बातम्या-

जनता खड्ड्यात राजा गुळगुळीत रस्त्यांवर; सर्व सामान्यांना न्याय कधी मिळणार?, नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंना टोला

अमृता फडणवीसांना विरोधी पक्षनेत्या करणार का? चंद्रकांत पाटलांवर पेडणेकर भडकल्या, रश्मी ठाकरेंवरच्या प्रश्नाला उत्तर