संजय राऊत यांचा जामीनदारच फोडला, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला राऊत यांच्यासह ठाकरे यांना दणका
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांचे जामीनदार असलेले भाऊसाहेब चौधरी यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने संजय राऊत यांना शिंदे यांनी मोठा धक्का दिल्याचे बोललं जात आहे.
नाशिक : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय तथा नाशिकचे संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी नुकताच शिंदे गटात प्रवेश केला आहे. चौधरी हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची कुणकुण ठाकरे गटाला लागताच त्यांनी चौधरी यांची हकालपट्टी केल्याचे ट्विट केले होते. यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही कारवाई केल्याचे संजय राऊत यांनी ट्विटमध्ये म्हंटलं आहे. विशेष म्हणजे संजय राऊत हे पत्राचाळ घोटाळ्यात तुरुंगात असतांना त्यांना जामीन मिळवण्यासाठी संजय राऊत यांचे बंधु सुनील राऊत आणि भाऊसाहेब चौधरी यांनी सह्या केल्या आहेत. भाऊसाहेब चौधरी हे संजय राऊत यांचे जामीनदार आहे. एकूणच संजय राऊत यांचे जामीनदार असलेले भाऊसाहेब चौधरीच शिंदे गटात दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. संजय राऊत यांना त्यांचा जामीनदारच सांभाळता आला नाही ते पक्ष काय सांभाळतील अशी चर्चाही नाशिकच्या शिंदे गटातील पदाढीकऱ्यांमध्ये होऊ लागली आहे.
संजय राऊत यांनी बुधवारी सायंकाळी नाशिकचे संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती ट्विट करून दिली आहे.
यामध्ये ठाकरे गटाचे नगरसेवक शिंदे गटात दाखल झाल्याने ही कारवाई करण्यात आल्याची चर्चा असून संजय राऊत यांचा राइट हँड तथा निकटवर्तीय म्हणून ओळख चौधरी यांची महाराष्ट्रात ओळख आहे.
संजय राऊत यांना जामीनदार असलेल्या चौधरी यांच्याच पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचे ट्विट राऊत यांना करण्याची वेळ आली होती.
मागील आठवड्यात ठाकरे गटाचे 13 नगरसेवक शिंदे गटात दाखल झाले आहे, त्यांनंतर आता संजय राऊत यांचे निकटवर्तीय भाऊसाहेब चौधरी हे शिंदे गटात दाखल झाले आहे.
भाऊसाहेब चौधरी हे संजय राऊत यांचे जामीनदार असल्याने राऊत यांना हा मोठा दणका मानला जात आहे.