भुजबळ यांच्या कार्यकर्त्यांनीच हॉटेल फोडलं? मनोज जरांगे पाटील यांचा आरोप काय?
manoj jarange patil and maratha reservation : आरक्षणाच्या प्रश्नावरुन सध्या छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात वाकयुद्ध सुरु आहे. गेल्या दोन दिवसांपासून आरोप-प्रत्यारोप सुरु आहे. मंगळवारी पुन्हा मनोज जरांगे पाटील यांच्यावर आरोप केले. छगन भुजबळ यांच्या नातेवाईकांचे हॉटेल कोणी फोडले ते सांगितले.
छत्रपती संभाजीनगर | 07 नोव्हेंबर 2023 : मराठा आरक्षणाबाबत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी वेगळी भूमिका घेतली. सोमवारी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत राज्य सरकारला घेरले. यावेळी त्यांनी ओबीसीमधून मराठा आरक्षण देण्यास तीव्र विरोध दर्शवला. तसेच प्रकाश सोळके यांचे घर पेटवले आणि सनराईज हॉटेल संपूर्ण जाळण्यात आले. त्यावरुन त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याकडे काही प्रश्न उपस्थित केले. गुन्हे मागे घ्या कसं म्हणता? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आता छगन भुजबळ यांच्यावर मनोज जरांगे पाटील यांनी पलटवार केला आहे. भुजबळ साहेबांच्या नातेवाईकाचं जे हॉटेल फुटलंय ते त्यांच्याच लोकांनी फोडलंय आणि त्यांना अटक करण्यात आलेली आहे. अशी मला खात्रीलायक माहिती मिळाली आहे, असे त्यांनी म्हटले.
काय म्हटले मनोज जरांगे पाटील यांनी
षडयंत्र काय आहे हे तुम्हाला सांगतो, मला नुकतीच माहिती मिळाली. ही माहिती खोटी असेल तर मी माझे शब्द मागे घेईल. बीडचे काही बांधव काल आले होते. भुजबळ साहेबांच्या नातेवाईकाचं जे हॉटेल फुटलंय ते त्यांच्याच लोकांनी फोडलंय आणि त्यांना अटक करण्यात आलेली आहे. मराठे शांततेत आंदोलन करत आहेत. यात सत्ताधाऱ्यांचेच लोकं आमच्या मराठ्याच्या आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करत आहेत. हा माझा दावा तंतोतत खरा आहे. तसेच पूर्ववैमन्यस्यातून एकमेकांची घरे फोडली, दगडफेक झाली आहे. मराठा समाजातील तरुणांचा या जाळपोळीशी काही संबंध नाही. समाजातील तरुणांनी शांततेत साखळी उपोषण आणि आंदोलन केले आहे.
मराठ्यांच्या कल्याणास एक, दोन ओबींसीचा विरोध
मराठा समाजाला आवाहन करतो. आपल्या गोरगरीबांचं आता कल्याण होणार आहे. फक्त एक, दोन ओबीसींना ते पाहावत नाही. त्यामुळे मराठ्यांनी शांततेत आपली एकजूट वाढवा. महाराष्ट्रातील जे मराठ्यांचे सर्व पक्षांचे नेते आहेत, त्यांना विनंती आहे, जाणूनबुजून षडयंत्र रचलं जात आहे. शांततेत आंदोलन करणाऱ्या पोरांना केसेसमध्ये अडकवले जात आहे. मराठ्याचा मुलांना तुम्ही मदत केली नाही, तर महाराष्ट्रातील मराठ्यांची पोरं तुम्हाला कधीच माफ करणार नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
न्यायमूर्तींना कोणी पाठवले?
निवृत्त न्यायमूर्तींना देवेंद्र फडणवीस यांनी पाठवलं की एकनाथ शिंदेंनी मला माहीत नाही. पण पाठवणाऱ्यांनी आणि येणाऱ्यांनी योग्यच केलं. खुर्चीत बसून न्यायदान करणं आणि जनतेत जाऊन न्यायदान करणं चांगलंच आहे. न्यायाधीश जनता दरबार घेऊन शकतात. जनतेत येऊ शकतात. न्याय करणारे जनतेत गेले तर तुम्हाला काय वाईट वाटलं. एवढीपण जळजळ का व्हावी मराठा समाजांबद्दल, असा सवाल मनोज जरांगे यांनी भुजबळ यांना केला.