संतोष देशमुख हत्याप्रकरणात मोठं ट्विस्ट; नवीन एसआयटीची स्थापना, कारण काय?
मोठी बातमी समोर येत आहे, बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात आता नव्या एसआयटीची नियुक्ती करण्यात आली आहे.
बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. या घटनेनं खळबळ उडाली आहे. राज्यात चांगलंच वातावरण तापलं आहे. या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे, सोबतच न्यायालयीन चौकशी सुरू असून, एसआयटीची स्थापना देखील करण्यात आली होती. मात्र आता या प्रकरणात पुन्हा एकदा नव्यान एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. नव्या एसआयटीमध्ये अनिल गुजर. विजयसिंग जोनवाल, महेश विघ्ने, आनंद शंकर शिंदे, तुळशीराम जगताप, मनोज राजेंद्र वाघ,चंद्रकांत एस काळकुटे, बाळासाहेब देविदास अहंकारे, संतोष भगवानराव गित्ते या पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. या एसआयटीचे अध्यक्ष म्हणून बसवराज तेली हेच कायम राहणार आहेत.
नेमकं कारण काय?
समोर आलेल्या माहितीनुसार संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात जी एसआयटी नेमण्यात आली होती, त्या एसआयटीवर संतोष देशमुख यांच्या कुटुंबाकडून आक्षेप घेण्यात आला होता. यातील काही अधिकाऱ्यांचे वाल्मिक कराडशी संबंध आहेत, असा आरोप देशमुख यांच्या कुटुंबाने केला होता. त्यानंतर आता एसआयटी बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बसवराज तेली हेच नव्या एसआयटीचे अध्यक्ष राहणार आहेत, मात्र यातील काही पोलीस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे.
मस्साजोगचे ग्रामस्थ आक्रमक
संतोष देशमुख हत्याप्रकरणातील आठ आरोपींना मोक्का लावण्यात आला आहे, मात्र या प्रकरणात आरोप होऊन देखील वाल्मिक कराड यांच्यावर मोक्का न लावण्यात आल्यानं आज मस्साजोगचे ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले, पाण्याच्या टाकीवर चढून ग्रामस्थांनी आंदोलन केलं. या आंदोलनामध्ये संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख देखील सहभागी झाले होते. वाल्मिक कराडवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली. या आंदोलनात मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील देखील सहभागी झाले होते, यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार टीका केली, वाल्मिक कराडवर मोक्का का लावला जात नाही असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.