भाजप महायुतीची बंडखोर आणि अपक्ष विजयी उमेदवारांवर करडी नजर असणार आहे. बंडखोर आणि अपक्ष निवडून येणाऱ्या आमदारांना संपर्क करण्यासाठी भाजपनं जबाबदारी वाटून दिली आहे. भाजपचे रवींद्र चव्हाण, प्रवीण दरेकर, संजय कुटे, मोहित कंबोज, नितेश राणे आणि निरंजन डावखरे यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर भाजपच्या नेत्यांची महत्वाची बैठक झाली. देवेंद्र फडणवीस यांच्याकडून प्रमुख नेत्यांकडून आढावा घेतला. बैठकीत चंद्रशेखर बावनकुळे, प्रसाद लाड , प्रवीण दरेकर, रावसाहेब दानवे, गिरीश महाजन आणि चित्रा वाघ उपस्थित होत्या. प्रत्येक नेत्याला एक महत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.
याशिवाय मंगलप्रभात लोढा, भूपेंद्र यादव आणि पराग शाह, कालिदास कोळंबकर, जयकुमार गोरे, मिहिर कोटेचा हे नेते देखील उपस्थित होते. उद्या मतमोजणीनंतर मुख्यमंत्र्यांचे गणित जुळवण्यासाठी भाजपचे सगळे नेते, पदाधिकारी आणि उमेदवार सागर बंगल्यावर उपस्थित होते. विशेष म्हणजे मनसेचे बाळा नांदगावकर देखील सागर बंगल्यावर दिसून आले.
एक्झिट पोलमध्ये महायुतीचं सरकार येणार असल्याचं संकेत आहेत. पण तरी देखील काहीज जागा कमी पडल्या तर आधीच जुळवाजुळव सुरु आहे. महाविकासआघाडीने देखील बैठका घेणं सुरु केले आहे. आता काही तासातच निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे सत्ता नेमकी कुणाच्या हातात जाते याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.
शनिवारी सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मतमोजणी केंद्रावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. दुपारी दोन पर्यंत सर्व चित्र स्पष्ट होणार आहे. मतमोजणी केंद्रावर सीसीटीव्हीची देखील नजर असणार आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.