सांगली : गेल्या दोन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. संपामुळे एसटी सेवा ठप्प झाली असून, सर्वसामान्य प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यामुळे आता एसटी कर्मचाऱ्यांनी सरकारशी चर्चा करून संपावर तोडगा काढावा अशी मागणी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. ते सांगली दौऱ्यावर असताना पत्रकारांशी बोेलत होते. दरम्यान भाजपाच्या वतीने संपात सहभागी असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांचे राशन देण्यात येणार असल्याची घोषणा देखील यावेळी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
चंद्रकांत पाटील आज सांगली दौऱ्यावर होते, यावेळी त्यांनी संपात सहभागी असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांची भेट घेतली. त्यांच्याशी संवाद साधला. एसटी कर्मचाऱ्यांनी देखील आपल्या व्याथा पाटलांसमोर मांडल्या. यावेळी बोलताना पाटील म्हणाले की, एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन गेल्या दोन महिन्यांपासून सुरू आहे. मात्र सरकार आंदोलनाकडे दुर्लक्ष करत आहे. मात्र असे न करता सरकारने देखील कामगारांच्या व्याथा समजावून घेतल्या पाहिजे. कर्मचाऱ्यांची समजूत घालून संपावर लवकरात लवकर तोडगा काढावा अशी मागणी यावेळी त्यांनी केली.
गेल्या दोन महिन्यांपासून एसटी सेवा ठप्प आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. खासगी बसने दुपटीने भाडेवाढ केली आहे. हे आता थांबायला हवे. जर खासगी बसच्या चालकाला 50 हजार रुपये पगार असेल, तर तेवढाच पगार हा महामंडळाच्या बस चालकाला का दिला जात नाही. असा सवालही यावेळी पाटील यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. मात्र तरी देखील एसटी कर्मचारी विलिनिकरणाच्या मुद्द्यावर ठाम असल्याने, या संपावर अद्याप तोडगा निघू शकलेला नाही.
भगव्याला दैवत मानलं, भगव्यालाच कवटाळून गळफास, उस्मानाबादेत कट्टर शिवनसैनिकाची आत्महत्या! काय घडलं??