शिवसेना खासदाराच्या मतदारसंघात भाजपाकडून भावी खासदाराचे फलक, शिवसेनेचे टेन्शन वाढले
LokSabha Election 2024 | दिनकर पाटील हे अनेक महिन्यांपासून मतदार संघातील अनेक कार्यक्रम, समारंभ यांना उपस्थित राहत आहेत. त्यातच त्यांच्या वाढदिवसानिमित्त नाशिक मुंबई महामार्गावर, इगतपुरी शहरातील विविध भागासह भावी खासदार म्हणून उल्लेख केलेले फलक लावले आहे.
नाशिक | दि. 29 फेब्रुवारी 2024 : नाशिक लोकसभा मतदार संघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. गेल्या दोन वेळेस शिवसेनेचे खासदार म्हणून हेमंत गोडसे निवडून आले होते. मात्र यंदा नाशिक लोकसभा मतदार संघात भारतीय जनता पक्षाने आपली ताकत वाढवली आहे. या मतदार संघात स्वामी कंठानंद यांच्यानंतर नाशिकचे माजी नगरसेवक दिनकर अण्णा पाटील यांनीही खासदारकीसाठी जोर लावायला सुरुवात केली आहे. दिनकर पाटील हे अनेक महिन्यांपासून मतदार संघातील अनेक कार्यक्रम, समारंभ यांना उपस्थित राहत असून संपर्क वाढवत आहेत. त्यातच त्यांच्या वाढदिवसानिमित्त नाशिक मुंबई महामार्गावर, इगतपुरी शहरातील विविध भागासह भावी खासदार म्हणून उल्लेख केलेले फलक लावलेले पहावयास मिळत असून लोकांचाही त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.
गोडसे यांना म्हणाले होते, मार्गात येऊ नका
नाशिक येथे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत नाशिक येथे अमृत भारत योजने अंतर्गत रेल्वे स्थानकाच्या विविध विकासकामांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृष्य प्रणालीद्वारे झाले. त्यावेळी दिनकर पाटील यांनी समोर येत असलेल्या खासदार हेमंत गोडसे यांना माझ्या मार्गात येऊ नका, असे म्हणत बाजूला केले. नुकतेच ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांनी खासदार हेमंत गोडसे हे मिलिंद नार्वेकर यांना भेटत असून ठाकरे गटात येणार असल्याचा भर सभेत गौप्यस्फोट केला. यामुळे गोडसे यांना तिकीट मिळणार की नाही? हा ही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. त्यातही हेमंत गोडसे हे मतदार संघात कमी दिसत असल्याने ग्रामीण भागात त्यांच्यासाठी लोकांमध्ये नाराजी आहे.
गेल्या वेळी तिसऱ्या क्रमांकावर
ठाकरे गटाकडून विजय करंजकर हे इच्छुक आहेत तर दुसरीकडे शंतिगिरी महाराज यांनीही लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली. यामुळे नाशिक मतदार संघात चुरशीची लढाई पहावयास मिळणार आहे. भाजपकडून इच्छूक असलेले दिनकर पाटील यांच्या मतदार संघातील गाठीभेटी वाढल्या आहेत.
आता दिनकर पाटलांच्या बॅनरबाजीमुळे इतर पक्षांचे उमेदवारांचे टेन्शन वाढले आहे. गेल्या वेळेस दिनकर पाटील हे बसपाकडून लोकसभा लढले होते. त्यावेळी ते तिसऱ्या क्रमांकावर होते. त्यामुळे यावेळेस दिनकर पाटील हे नक्कीच तगडी टक्कर देतील यात शंका नाही.