‘शिवसेना फोडण्यात संजय राऊत यांचा सिंहाचा वाटा, त्यावेळी मातोश्रीवर आमदारांना…’, भाजप नेत्याचा धक्कादायक दावा
शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी आज सकाळी शिंदे यांच्या बंडामागे खरे सूत्रधार आपण असल्याचं एका कार्यक्रमात स्पष्ट केलं. पण त्यानंतर एका भाजप नेत्याने संजय राऊत यांच्याबाबत दावा केलाय.
मुंबई : महाराष्ट्रात सहा महिन्यांपूर्वी मोठा राजकीय भूकंप आला होता. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील तब्बल 40 आमदारांसह बंड पुकारलं होतं. त्यांच्या या बंडामुळे शिवसेनेला मोठं खिंडार पडलं. या बंडामुळे शिवसेनेत निर्माण झालेली पोकळी लवकर भरुन निघणारी नाहीय. या संकट काळात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत खासदार संजय राऊत खमकेपणाने उभे राहिले. पण भाजपच्या एका नेत्याने धक्कादायक दावा केलाय. संजय राऊत यांच्याकडून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सुरुंग लावण्याचे काम सुरु आहे, असा दावा भाजप नेत्याकडून करण्यात आलाय.
विशेष म्हणजे शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी आज सकाळी शिंदे यांच्या बंडामागे खरे सूत्रधार आपण असल्याचं एका कार्यक्रमात स्पष्ट केलं. पण त्यानंतर भाजप नेते गिरीश महाजन यांनी शिवसेना फोडण्यात संजय राऊत यांचा मोठा वाटा असल्याचा दावा केलाय.
“खरंतर संजय राऊत हेच एकनाथ शिंदे यांना मोठी मदत करत आहेत. मातोश्रीवर त्यावेळी काही आमदार गेले, त्यांना संजय राऊत म्हणाले, तुम्हाला जायचं असेल तर तुम्हीही जा. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सुरुंग लावण्याचे काम संजय राऊत करत आहेत”, असं विधान गिरीश महाजन यांनी केलंय.
“संजय राऊत यांचा शिवसेना फोडण्यात मोठा सिंहाचा वाटा आहे. ते ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मांडीवर जाऊन बसले, त्यांनी शिवसेनेला सुरुंग लावला, त्यामुळे कट्टर शिवसैनिक नाराज झाले. खऱ्या अर्थाने हे सरकार येण्याचं श्रेय त्यांचंच आहे”, असा दावा गिरीश महाजन यांनी केला.
“संजय राऊत हे एकनाथ शिंदे यांना मोठी मदत करत आहेत, शिवसेनेला सुरुंग लावण्याचं काम संजय राऊतच करत आहेत’, असा धक्कादायक दावा गिरीश महाजन यांनी केलाय.
या दरम्यान, संजय राऊत यांनी आपण उद्या उद्धव ठाकरे यांच्यासोबत नागपुरात जाऊन गौप्यस्फोट करणार असल्याचं विधान केलं होतं. त्यावरही गिरीश महाजन यांनी टीका केलीय.
“संजय राऊत नेहमीच बॉम्ब आणतात आणि ते फुसके निघतात. त्यांच्याकडे बोलण्याशिवाय दुसरं काही राहिलेलं नाही. मागच्यावेळी देखील त्यांनी असाच बॉम्ब तयार केला होता. पण साधा लोंगी फटाका देखील त्यांनी फोडला नाही”, असा टोला गिरीश महाजन यांनी लगावला.