शुभ-अशुभाच्या गर्तेत अडकला ‘रामटेक’, चंद्रशेखर बावनकुळेंना नकोय रामटेक बंगला?
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना आघाडी सरकारमध्ये रामटेक बंगला मिळाला होता. त्यावेळी तेलगी प्रकरण गाजलं, स्टॅम्प पेपर घोटाळ्यात छगन भुजबळ यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. आता पुन्हा महायुती सरकारमध्ये भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान मिळालेलं नाही.
राज्यातील मंत्रिमंडळांचं खातेवाटपानंतर बंगल्याचं वाटप करण्यात आलं आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा रामटेक हा सरकारी बंगला चर्चेत आलाय. सध्या हा बंगला महसूल मंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंना मिळालाय. पण आता, बावनकुळे बंगल्याची अदलाबदल करण्याच्या प्रयत्नात असल्याची चर्चा आहे. कारण हा बंगला शुभ-अशूभ अशा चर्चेत कायम अडकला आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांना रामटेक बंगला मिळाला. पण ते भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यासोबत बंगल्याची अदलाबदल करणार असल्याची चर्चा आहे.
पंकजा मुंडे यांना सध्या पर्णकुटी बंगला मिळाला आहे. विशेष म्हणजे पंकजा मुंडे यांचीही रामटेक बंगला घेण्यास तयारी असल्याची सूत्रांची माहिती आहे. दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे मंत्री असताना रामटेक बंगल्यात वास्तव्यास होते. तसं पाहिलं तर रामटेक बंगला ऐसपैस आहे. मुंबईतल्या मलबार हिल परिसरात आणि तेही सी फेस व्ह्यू असा हा बंगला आहे. आता रामटेक बंगला घेताना मंत्री का कचरतात? त्याचीही काही उदाहरणं आहेत. पण हा योगायोग असू शकतो.
रामटेक बंगल्याचा इतिहास काय?
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना आघाडी सरकारमध्ये रामटेक बंगला मिळाला होता. त्यावेळी तेलगी प्रकरण गाजलं, स्टॅम्प पेपर घोटाळ्यात छगन भुजबळ यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. आता पुन्हा महायुती सरकारमध्ये भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान मिळालेलं नाही. महसूल मंत्री असताना 2014 मध्ये एकनाथ खडसेंना युतीच्या काळात रामटेक बंगला मिळाला. पण खडसेंवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आणि राजीनामा द्यावा लागला. शिवसेनेचे नेते दीपक केसरकर, गेल्या अडीच वर्षात रामटेक बंगल्यातच वास्तव्यास होते. मात्र महायुतीला भरघोस यश मिळाल्यावरही केसरकरांना मंत्रिपदावरुन पत्ता कट झाला.
बंगले आणि फ्लॅटवरुन मंत्र्यांमध्ये नाराजीनाट्य
दुसरीकडे बंगले आणि फ्लॅटवरुन नाराजीनाट्य रंगल्याची चर्चा आहे. खातेवाटपानंतर आता बंगल्यांवरुन शिंदेंच्या शिवसेनेच्या मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती आहे. भाजपच्या मंत्र्यांना चांगले बंगले आणि शिंदेंच्या मंत्र्यांना फ्लॅट दिल्यानं या मंत्र्यांनी खंत व्यक्त केल्याची माहिती आहे. फ्लॅट कोणाकोणाला मिळलेत तेआधी पाहुयात.
कोणकोणत्या मंत्र्यांना फ्लॅट मिळाले?
- शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांना अंबर इमारतीत 38 नंबरचा फ्लॅट मिळालाय.
- प्रताप सरनाईकांना अवंती इमारतीत, 5 नंबरच्या फ्लॅटचं वाटप झालं
- भरत गोगावलेंना सुरुची इमारतीत 2 क्रमाकाचा फ्लॅट मिळालाय
- अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मंत्री माणिकराव कोकाटेंना अंबर इमारतीत 27 क्रमाकांचा फ्लॅट देण्यात आलाय
- नरहरी झिरवाळांना सुरुची इमारतीत 9 नंबरचा फ्लॅट
- मकरंद पाटलांना सुरुची इमारतीतच 3 क्रमाकांचा फ्लॅट मिळालाय
- भाजपचे मंत्री संजय सावकारेंनाच अंबर इमारतीत 32 नंबरचा फ्लॅट देण्यात आलाय.
दरम्यान, आधी मंत्रिमंडळात स्थान मिळवण्यासाठी रस्सीखेच. नंतर मनासारखं खात्यासाठीही लॉबिंग. आता बंगला आणि फ्लॅटवरुन चढाओढ झाल्याचं बघायला मिळालं आहे.