‘आम्हाला विजयाचा सराव, पराभवातून…’, कसब्यात 27 वर्षांनंतर अपयश आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया
"अजित पवारांना विचारा की पिंपरी चिंचवडमध्ये कोणत्या नेत्याचा पराभव आहे? कारण तुम्ही प्रचारात शरद पवार यांनाही उतरवलं, उद्धव ठाकरेंनाही उतरवलं. त्यामुळे आमचा इथे पराभव असेल तर तिथे त्यांचाही पराभव असेल", असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मुंबई : कसबा (Kasba) आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकीच्या निकालावर (Chinchwad by-election result) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची पहिली प्रतिक्रिया दिलीय. फडणवीस यांनी रात्री उशिरा प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी कसब्यात भाजपला अपयश मिळालं असलं तरी काही हरकत नाही. पुढच्या 2024 च्या निवडणुकीत भाजप जिंकून येईल. भाजपला जिंकण्याचा सराव आहे, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली. आम्ही पराभवातून आत्मचिंतन करतोच. पण विजयाचा आम्हाला सराव आहे, असं स्पष्ट वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं.
“अलिकडच्या काळात एखादा विजय मिळाला की आनंद गगनात मावेसा होतो. कारण विजयाची सवय ही त्यांची तुटलेली आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी हा मोठा आनंद आहे. आम्हाला विजयाचा सराव आहे. पराभवातून आम्ही आत्मचिंतन करतोच. कसब्याचे आत्मचिंतन आम्ही करु. आम्ही 2024 साली पुन्हा येणारच आहोत आणि कसबा जिंकणारच आहोत”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
देवेंद्र फडणवीस आणखी काय-काय म्हणाले?
सातत्याने जिंकणारे कधीतरी हरले तर त्याचीच चर्चा जास्त होते. ती चर्चा जास्त होणे साहजिकच आहे. देशभरात भाजपला जे यश मिळालं आहे त्याबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो. तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतला निकाल पाहता ही 2024 च्या लोकसभा निवडणुकांसाठी नांदी आहे.
महाराष्ट्रातही दोन ठिकाणी पोटनिवडणुकीची निवडणूक पार पडली. दोन्ही जागा आमच्या निवडून येतील असं आम्हाला अपेक्षित होतं. मात्र कसब्यात अतिशय चांगले मतं घेऊनही आम्ही विजयी होऊ शकलो नाहीत. जवळपास ४५ टक्के मतं आम्हाला मिळाली आहेत जी 2009 आणि 2014 पेक्षा जास्त आहे.
कसब्यातला विजय हा महाविकास आघाडीचा विजय नाही. कारण काँग्रेसच्या उमेदवाराने साधे राहुल गांधी यांचे फोटोदेखील वापरले नव्हते. उमेदवार राहुल धंगेकर यांच्याबद्दल लोकांमध्ये सहानुभूती होती. ती सहानुभूती आमच्या सर्व्हेतही दिसत होती. पण आम्हाला असा विश्वास होता की, हळूहळू ही सहानुभूती कमी होईल. पण ती शेवटपर्यंत राहिली. त्यामुळे त्यांना विजय मिळाला. तो कसाही मिळाला असला तरी तो विजय आहे आणि त्यामुळे मी त्यांचं अभिनंदन करतो.
पिंपरी चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप यांना 36 हजार मतांनी विजय मिळालाय. चिंचवडच्या जनतेने एकप्रकारे आमचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांना एकप्रकारे श्रद्धांजली वाहिली आहे. एक गोष्ट अजून याठिकाणी सांगितली पाहिजे की, राहुल कलाटे उभे राहिले म्हणून भाजप उमेदवार जिंकले असा भ्रम काही लोक तयार करत आहेत. पण ते सत्य नाही.
याचं कारण 2019 ला पहिल्यांदा हा प्रयोग करण्यात आला. राहुल कलाटे यांना सगळ्या पक्षांनी पाठिंबा देऊन स्वतंत्र उमेदवार म्हणून उभं केलं. पण ते त्याठिकाणी जवळपास 38 हजार मतांच्या फरकाने हरले होते. त्यावेळेस हा प्रयोग का झाला होता? कारण त्याहीवेळेस माहिती होतं की, काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर त्यांना उभं केलं तर जी शिवसेनेची हिंदुत्ववादी मतं ही सरळ भाजपकडे जातील. त्यामुळे त्यांना अपक्ष म्हणून उभं केलं होतं.
तसंच याहीवेळेस राहुल कलाटे उभे राहिले नाही तर जे हिंदुत्ववादी मते शिवसेनेकडे जातात ते सर्व मते भाजपकडे जातील. म्हणून त्यांना उभं करण्यात आलं. म्हणून त्यांनी मतं घेतली. ते उभे राहिले नसते तर त्यातील 60 ते 65 टक्के मतं ही भाजपला मिळाली असती. म्हणून ही राष्ट्रवादी काँग्रेसची स्ट्रॅटेजी होती. त्यातून त्यांनी राहुल कलाटे यांना उभं केलं होतं. पण तरीही भाजपवर विश्वास लोकांनी दाखवला आणि अतिशय चांगल्या फरकाने भाजप उमेदवारांना जिंकून आणलंय.