ठाण्यात बंद दाराआड काय घडलं? एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया
ठाण्यात आज भाजप नेते गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येतीची विचारपूस केली. शिंदे यांना थ्रोट इन्फेक्शन आहे, असे महाजन यांनी सांगितले. त्यांनी युतीतील कोणतेही मतभेद नाहीत, असे स्पष्ट केले आणि ५ तारखेच्या शपथविधीची तयारी सुरू असल्याचेही सांगितले.
ठाण्यात आज मोठ्या घडामोडी घडल्या. भाजप नेते गिरीश महाजन यांनी आज काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी जावून भेट घेतली. या भेटीनंतर गिरीश महाजन यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. “गेल्या पाच-सहा दिवासांपासून आमचे नेते एकनाथ शिंदे यांची तब्येत खराब होती. त्यांना थ्रोट इन्फेक्शन आहे, तसेच इतर त्रासही होत आहेत. त्यामुळे तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मी इथे आलो होतो. खरंतर मी तीन-चार दिवसांपूर्वीच त्यांच्या भेटीची वेळ मागितली होती. पण ते गावी निघून गेले. त्यानंतर माझा त्यांच्याशी संपर्क झाला नाही. पण आज मी मुद्दामून एकनाथ शिंदे यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी या ठिकाणी आलो होतो”, अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली.
“युतीमध्ये सर्व आलबेल आहे. सर्व व्यवस्थित आहे. आमच्यामध्ये कुठेही मतभेद नाहीत. तीन दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन अगदी स्पष्टच सांगितलेलं आहे. त्यामुळे मला काही नवीन सांगण्याची गरज नाही. कुठेही मतभेद नाहीत. आमची 5 तारखेची तयारी सुरु आहे”, असं गिरीश महाजन यांनी सांगितलं. “मला असं वाटतं की, त्यांची उद्या तब्येत सुधारल्यानंतर ते बैठक घेणार आहेत. ते शासकीय बैठक घेण्याची शक्यता आहे. सूत्रांकडून ज्या गोष्टी बाहेर येत आहेत तसे कोणतेही मतभेद आमच्यात नाहीत”, असं गिरीश महाजन यांनी स्पष्ट केलं.
‘एकनाथ शिंदे यांच्या हाताला अजूनही सलाईन’
“माझी गृहमंत्री पदाबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. हा सगळा वरिष्ठ पातळीवरचा निर्णय आहे. त्याबाबतीत आम्ही एक शब्दही बोललो नाही. कोणतं खातं कुणाला पाहिजे, याबाबत आमच्यात चर्चा झालेली नाही. मी फक्त एकनाथ शिंद यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आलो होतो. त्यांच्या हाताला अजूनही सलाईन लागलेली आहे. आम्ही सर्व एकत्र आहोत. आमच्यात कुठेही दुरावा नाही. तुम्हाला आम्ही सर्व एकत्र दिसू. आमच्या 5 तारखेचा शपथविधीचा कार्यक्रम अतिशय दिमाखदार होईल. आमच्यात कोणतंही मतमतांतर नाही”, असं गिरीश महाजन म्हणाले.
गिरीश महाजन यांना यावेळी प्रश्न विचारण्यात आला की, आजचा प्रॉब्लेम सोडवला का? त्यावर गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली. “आजचा हा प्रॉब्लेम नव्हता. मी तब्येतीची विचारपूस करायला आलो होतो. मी एकनाथ शिंदे यांना 30 वर्षांपासून ओळखतो. त्यामुळे छोट्या-मोठ्या गोष्टींसाठी रुसले आहेत, रागावले आहेत, चिडले आहेत, असं अजिबात होणार नाही”, असंही गिरीश महाजन यावेळी म्हणाले.