सिंधुदुर्ग : शिवसैनिक संतोष परब हल्लाप्रकरणात आमदार नितेश राणेंची अखेर पोलिसांकडून चौकशी करण्यात आली आहे. या हल्ला प्रकरणात चौकशीला उपस्थित राहण्यासाठी कणकवली पोलिसांनी 21 तारखेला नोटीस बजावली होती. यावेळी मला मुद्दाम टार्गेट केले जात आहे, असा आरोपही नितेश राणे यांनी केला आहे. अधिवेशनावेळी विधानभवनाबाहेर बोलताना, तुम्हाला जास्त विरोध केला जातो, तेव्हा तुम्ही योग्य आणि चांगले काम करत आहे असे समजायचे, मी योग्य काम करतोय, म्हणून मला टार्गेट केले जात आहे. मात्र मी गप्प बसणार नाही, मी आणखी आक्रमकतेने सरकारवर तुटून पडणार असल्याचेही नितेश राणे म्हणाले होते.
नितेश राणेंची कणकवली पोलिसांकडून चौकशी
पोलीस चौकशीसाठी आमदार नितेश राणे कणकवली पोलीस स्थानकात पोहचले होते. यावेळी तब्बल पाऊण तास ही चौकशी चालली. पोलीस निरीक्षक यांच्या दालनात ही चौकशी झाल्याची माहिती समोर आली आहे. अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक, डिवायएसपी, पोलीस निरीक्षक हे पोलीस अधिकारी चौकशीवेळी उपस्थित होते. चौकशीला सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे नितेश राणे यांनी सांगितले आहे. जी माहिती पोलिसांना हवी होती ती दिली असल्याचे ही सांगितले.
विनायक राऊतांचा रोख कुणाकडे?
कणकवलीत संतोष परब या शिवसैनिकावर झालेल्या हल्ल्यात पुणे येथील एका नेत्याच्या मॉलचा कर्मचारी होता, योग्यवेळी त्या नेत्याचे नाव जाहीर करणार, पोलिसांनी पडताळणी करावी असे विनायक राऊत म्हणाले आहेत. त्यामुळे विनायक राऊतांचा रोख राणेंकडे आहे का? असा सवालही उपस्थित होऊ लागला आहे. यावरून पुन्हा शिवसेना आणि राणे आमनेसामने येण्याचीही शक्यता आहे. आदित्य ठाकरे आल्यानंतर केलेल्या नक्कलीनंतर नितेश राणेंवर शिवसेनेकडून जोरदार टीकाही होत आहे. म्याऊ म्याऊ करून चिडवणे हा सिंधुदुर्गचा अपमान आहे. कोकणची संस्कृती अशी नाही. नितेश राणेंचा तो बालिशपणा.या कोकणाने आदर्श परंपरा निर्माण केली आहे त्याचे भान म्याव म्याव करणाऱ्यांनी राखायला हवं होतं. स्वतःतील पोरकटपणा, बालिशपणा दाखवण्याचा तो विद्रूपपणा होता. नितेश राणेंच्या वागण्याने सिंधुदुर्गवासीयांची मान खाली गेली आहे. अशी घणाघाती टीका खासदार विनायक राऊत यांनी केली आहे. अशातच शिवसैनिकावर झालेल्या हल्यात राऊत यांनी सूचक संकेत दिल्याने वादाचा दुसरा अंक सुरू होण्याची शक्यता आहे.