अखेर तो क्षण आलाच, भाजपला झटका, समरजित घाटगे यांचा शरद पवार गटात अधिकृत प्रवेश
अखेर भाजपला ज्या गोष्टीची भीती होती तेच घडलं आहे. कोल्हापूरच्या कागलमध्ये भाजप नेते समरजित घाटगे यांचा आज अधिकृतपणे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश झालाय. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत कागलच्या गैबी चौकात समरजित घाटगे यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी समरजित घाटगे यांच्याकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आलं.
भाजप नेते समरजित घाटगे यांचा आज कागलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात अधिकृतपणे प्रवेश झाला. त्यांचा पक्षप्रवेशाचा भव्य कार्यक्रम कागलमध्ये पार पडला. पक्षप्रमुख शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत समजित घाटगे यांचा हा पक्षप्रवेशाचा भव्य कार्यक्रम पार पडला. या पक्षप्रवेशानंतर समरजित घाटगे यांचं विधानसभेचं तिकीट फायनल झालं आहे. कागलमधील गैबी चौकात शरद पवारांची यावेळी जाहीर सभा आयोजित करण्यात आली. या सभेत पक्षप्रवेश झाल्यानंतर समरजित घाटगे यांनी भूमिका मांडण्यास सुरुवात केली. “कागलमध्ये 100 टक्के परिवर्तन होणार”, असं समरजित घाटगे म्हणाले. तसेच “पाऊस असूनदेखील सभेला मोठी गर्दी जमली आहे. पक्षात आणखी अनेकांचा प्रवेश होणार”, असं सूचक वक्तव्य समरजित घाटगे यांनी यावेळी केलं.
“शरद पवार यांनीच सांगितले की सभा गैबी चौकात घ्या. काही जणांना वाटत होत गैबी चौकातच आपलीच सभा होईल. पण हा वस्तादांचाच गैबी चौक आहे. स्वर्गीय मंडलिक आणि घाटगे यांनी राजकीय विरोध प्रामाणिकपणे केला. त्यांचा संघर्ष प्रामाणिक राहिला आहे. त्यांनी कागलचा पुरोगामी विचार पुढे नेला तेच मी करणार. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पुढचं राजकारण करणार. या कागलच्या भूमीत परिवर्तन करणारच”, असा निर्धार समरजित घाटगे यांनी यावेळी केली.
समरजित घाटगे यांचा हसन मुश्रीफांना टोला
“मीडियाची लोकं मला विचारतात, समोर जे कागलमधील मंत्री महोदय आहेत, जे पाच वेळा आमदार झाले आहेत, त्यांच्या बाजूने सगळे गट आहेत, त्यांच्याकडे महायुती, केंद्र, मोठमोठ्या संस्थांची ताकद आहे. मग तुमच्याकडे काय आहे? माझ्याकडे शरद पवार आणि जनतेची ताकद आहे. मला आणखी काही नकोय”, असं म्हणज समरजित घाटगे यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांना टोला लगावला.
“मी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतोय, आज परिवर्तनाचा मुहूर्तमेढ आहे, आज कुणीही विजयाचा आनंद साजरा करु नका, पुढच्या दोन महिन्यात आपल्याला खूप काम करायचं आहे. कागलमध्ये प्रत्येक घराघरात शरद पवारांचा विचार आपल्याला घेऊन जायचा आहे. प्रत्येक घरापर्यंत तुतारी पोहोचवायची आहे, त्यासाठी काम करा”, अशी सूचना समरजित घाटगे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिली.