शिवसेनेच्या 4 जागांवर टांगती तलवार, भाजप उमेदवार देण्याच्या तयारीत, सूत्रांची माहिती
महायुतीच्या जागावाटपाकडे सध्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे. कुणाला कोणती जागा मिळते, याबाबत नागरिकांमध्ये सुद्धा उत्सुकता आहे. महायुतीच्या गोटात सध्या बैठकांचं सत्र सुरु आहे. या बैठकांमधून काय निर्णय घेतला जातो ते आगामी काळात स्पष्ट होईलच. पण शिवसेनेच्या 4 जागांवर टांगती तलवार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
अक्षय मंकणी, Tv9 प्रतिनिधी, मुंबई | 7 मार्च 2024 : महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे सध्या जोरदार हालाचाली घडत आहेत. विशेष म्हणजे जागावाटपावरुन मित्रपक्षांमध्येच आता धुसफूस सुरु झाल्याची चर्चा आहे. महायुतीच्या जागावाटपाबाबत सध्या वेगवेगळ्या चर्चा समोर येताना दिसत आहेत. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी नुकतंच भाजपवर निशाणा साधला आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही 115 असूनही एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं, असं बोलून दाखवलं आहे. दोन्ही नेत्यांची वक्तव्ये थेट माध्यमांसमोर आल्याने पडद्यामागील महायुतीतली अंतर्गत धुसफूस आता चव्हाट्यावर आली आहे. लोकसभेच्या निवडणुका आता तोंडावर आल्या आहेत. पुढच्या 8 ते 15 दिवसांत निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीचा घोषणा होऊ शकते. त्यामुळे जागावाटपावरुन महायुतीत जबरदस्त खलबतं सुरु आहेत. भाजप या निवडणुकीत तब्बल 36 पेक्षा जास्त जागांवर उमेदवार देण्याच्या तयारीत आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. विशेष म्हणजे शिवसेनेच्या 4 जागांवर टांगती तलवार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
आतली बातमी नेमकी काय?
शिवसेनेच्या 4 जागांवर टांगती तलवार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यवतमाळ, हिंगोली, उत्तर पश्चिम मुंबई, नाशिकच्या जागेवर टांगती तलवार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे या जागांवरुन शिवसेना आणि भाजपमधील जागावाटपाचं घोडं अडलं आहे. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात सध्या शिवसेनेच्या भावना गवळी या खासदार आहेत. पण त्यांच्यावर ईडीचे आरोप असल्याचा दावा भाजपकडून केला जातोय. उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघात गजानन कीर्तिकर खासदार आहेत. पण इथे भाजपकडून त्यांच्या वयाचा मुद्दा उपस्थित केला जातोय. नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्यावर समाज माध्यमांवर आरोप करण्यात आल्याचा दावा केला जातोय. हिंगोली मतदारसंघात भाजप आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आपल्या पक्षाचा उमेदवार देण्याच्या तयारीत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिलीय.
महायुतीचा नेमका फॉर्म्युला काय?
महायुतीच्या जागावाटपाबाबत सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. जागावाटपासाठी खलबतंदेखील घडत आहे. महाराष्ट्रातील भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांची नुकतीच काल दिल्लीत पक्षाच्या हायकमांडसोबत बैठक पार पडली. या बैठकीत महत्त्वाची चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप या निवडणुकीत 36 पेक्षा जास्त उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. तर शिंदे गटाला 8 ते 10 आणि अजित पवार गटाला 3 ते 4 जागा मिळू शकतात, अशी चर्चा आहे. अर्थात या जागावाटपावर अंतिम शिक्कोर्तब झालेलं नाही. त्यामुळे आगामी काळात काय-काय घडामोडी घडतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.