शिंदेंना धक्का, गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड ठाकरे गटाच्या उमेदवाराच्या प्रचारात सहभागी
गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड या आज थेट ठाकरे गटाच्या कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्या प्रचार रॅलीत सहभागी झालेल्या बघायला मिळाल्या. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.
कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजप आणि शिवसेना या दोन्ही सत्ताधारी पक्षांच्या स्थानिक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये एकी नाही हे पुन्हा एकदा स्पष्ट होताना दिसत आहे. कारण कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. असं असलं तरीही भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड या आज थेट ठाकरे गटाच्या कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्या प्रचार रॅलीत सहभागी झालेल्या बघायला मिळाल्या. अंबरनाथ तालुक्यातील गोरपे गावात आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे एका मंदिराच्या जिर्णोद्धाराच्या कार्यक्रमाला आले होते. यावेळी संबंधित प्रकार बधायला मिळाला. हे पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.
संजय राऊत यांची आज अंबरनाथच्या नेवाळी नाक्यावरुन जोरदार स्वागत मिरवणूक काढण्यात आली. संजय राऊत या मिरवणुकीत ज्या जीपवर उभे होते त्याच जीपवर त्यांच्या पक्षाच्या कल्याण लोकसभेच्या उमेदवार वैशाली दरेकर होत्या. त्यांच्या बाजूला भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड होत्या. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. सुलभा गायकवाड यांना यातून नेमका काय संदेश द्यायचा आहे? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय.
भाजपची भूमिका काय?
भाजपचे नेते आणि कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. सुलभा गायकवाड यांना महायुतीचा धर्म पाळावाच लागेल, असं नरेंद्र पवार म्हणाले आहेत. “या संदर्भात अद्याप तरी आम्हाला काही माहीत नाही. मात्र जर असे झाले असेल तर आम्ही बसून गायकवाड यांची पुन्हा समजूत काढू. त्यांना महायुतीचा धर्म पाळावाच लागेल”, असे माध्यमांशी बोलताना नरेंद्र पवार यांनी सांगितले.
शिंदेंच्या शिवसेनेची प्रतिक्रिया काय?
शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. “गणपत गायकवाड यांच्या पत्नी आमदार नाहीत. त्या स्वतःचा निर्णय घेऊ शकतात. त्यामुळे त्यांच्या पत्नीने कार्यक्रमात सहभागी होणे म्हणजे सगळ्या भाजपने सहभागी झाले असं होतं नाही. मला वाटतं प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे. त्यामुळे त्या व्यक्तिगत त्यांच्या कार्यक्रमाला गेल्या असतील. त्यावर भाजपची नाराजी आहे असा अर्थ होत नाही”, अशी भूमिका गुलाबराव पाटील यांनी मांडली आहे.
संजय राऊत काय म्हणाले?
संजय राऊत यांनीसुद्धा याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. “धार्मिक कार्यक्रमाला आलो आहोत. राजकीय कार्यक्रम नाही. ताई स्वतः आमच्या बरोबर होत्या. त्यांचे पती तुरुंगात आहेत. पोलीस त्यांच्यामागे लागलेले आहेत. ते भाजपचे आमदार आहेत. ते आमच्या पक्षाचे आमदार नाहीत. पण गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या फार जवळचे आहेत. त्यामुळे हा प्रश्न त्यांना तुम्ही विचारायला हवा”, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.
वैशाली दरेकर काय म्हणाल्या?
अंबरनाथ तालुक्यातील गोरख या गावात देवीचा कार्यक्रम होता. सुंदर असं वातावरण आहे. गावाचं गावपण टिकलं पाहिजे. ज्या सोयी-सुविधा असतात ते मिळाले पाहिजे. त्याकडे आमचा कटाक्ष आहे. माझे लक्ष आहे. लोकांना बदल हवा आहे. तो लोकांच्या नजरेत दिसत आहे आणि तो बदल होणार. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मशाल लोकसभेत पोहोचणार, असं वैशाली दरेकर म्हणाल्या.
गणपत गायकवाड यांना माझा पाठिंबा आहे. त्यांचा देखील आम्हाला पाठिंबा आहे, असं मला वाटतं. एक स्त्री दुसऱ्या स्त्रीचा दुःख ओळखू शकते. वहिनींचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. नारीशक्ती नक्की दिसून येईल. देवीने राक्षसांचा नाश केला होता. यावेळी नारीशक्ती राक्षसांचा नाश करेल, अशी प्रतिक्रिया वैशाली दरेकर यांनी दिली.
सुलभा गायकवाड काय म्हणाल्या?
सुलभा गायकवाड यांनीदेखील प्रतिक्रिया दिली. “या ठिकाणी देवीचा कार्यक्रम आहे म्हणून राजकारणावरती बोलू शकत नाही. माझे पती गणपती गायकवाड हे जेलमध्ये आहेत. त्यांची जी कामं आहेत ते पुढे मी चालू ठेवणार आहे. जनतेमध्ये ज्या समस्या आहेत त्या सोडण्याचा प्रयत्न मी करणार आहे”, अशी प्रतिक्रिया सुलभा गायकवाड यांनी दिली.