‘रश्मी ठाकरेंना खुश करण्यासाठी…’, नितेश राणे यांचा सुषमा अंधारेंवर घणाघात
ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्याकडून नितेश राणे यांच्यावर निशाणा साधण्यात आला. यानंतर नितेश राणे यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. "सुषमा अंधारे रश्मी ठाकरेंना खुश करण्यासाठी आणि पद मिळावे यासाठी बोलत आहेत", अशी टीका नितेश राणे यांनी केली.

भाजप आमदार नितेश राणे यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना प्रत्युत्तर दिलं. “फर्निचरसाठी भांडणाऱ्या बाईवर किती बोलायचं? त्यांच्या घरी चार सोफा आणि दोन टेबल पाठवून देतो, म्हणजे शांत राहील. सुषमाताई यांना आपण दोष देत नाही. शिवसेना नेत्या मनीषा कायंदे या आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आल्या आहेत. पण त्याआधी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे होत्या. त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे त्यांना राणेंवर बोलण्यासाठी जबरदस्ती करायच्या. राणेंविरोधात बोललं नाही तर पद आणि तिकीट देणार नाही, असे सांगायच्या. त्यामुळे सुषमा अंधारे रश्मी ठाकरेंना खुश करण्यासाठी आणि पद मिळावे यासाठी बोलत आहेत”, अशी टीका नितेश राणे यांनी केली.
नितेश राणे यांचा अमोल मिटकरींवरही निशाणा
नितेश राणे यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्यावरही निशाणा साधला. “अमोल मिटकरींचा धर्म तपासण्याची वेळ आली आहे. त्याची सुंता करून धर्मांतर तर झाला नाही ना, हे पकडून तपासण्याची वेळ आली आहे. गोल टोपी घालून मोकळा करतो कारण तो हिंदू धर्मात राहिला ना”, अशी टीका नितेश राणे यांनी केली.
‘काल पेंग्विनला डायपर घालायची वेळ आणली’
“काल पेंग्विनला डायपर घालायची वेळ आणली होती. काल परवानगी दिली नसती तर तिथेच पेंग्विनची पॅन्ट ओली झाली असती”, अशी खोचक टीका नितेश राणे यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर केली. “राजकोटवर जाण्यासाठी जी वेळ आम्हाला दिली होती. त्याचवेळी महाविकास आघाडीचे नेते तिथे आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा प्रकरणी आम्हाला राजकारण करायचं नाही. सगळ्याच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना आपले आवाहन आहे, एकत्र येऊन पुतळा उभारू. राजकारण नको”, असं नितेश राणे म्हणाले.
नितेश राणे यांचा संजय राऊतांवर निशाणा
“आमच्यावर बोलण्यामुळे संजय राऊत यांना पगार मिळतो. नाहीतर त्यांच्या गाडीचे हप्ते कसे भरणार? ज्या नावाने पगार मिळतो ते काम करावेच लागते. नाहीतर दिवाळीचा बोनस, गाडीचे हप्ते कसे मिळणार? आमच्यामुळे पगार होणार असेल तर शुभेच्छा आहेत”, अशी खोचक टीका नितेश राणे यांनी केली. तसेच “अफजल खान हा मातोश्रीच्या तिसऱ्या माळावर राहतो”, असा घणाघात नितेश राणे यांनी केला.