ठाण्याच्या ‘जेल’वरुन महायुतीत मतभेद, ‘हा बिल्डर लॉबीचा छुपा डाव’, भाजप आमदाराचा कडाडून विरोध
ठाणे जेल पडघाला हलवण्यासाठी हालचाली सुरु आहेत. अजित पवार गटाकडून याबाबतची मागणी करण्यात आली होती. मुख्यमंत्र्यांनी ही मागणी मान्यही केली. पण भाजप आमदाराचा त्याला विरोध आहे. त्यामुळे ठाण्याच्या जेलवरुन महायुतीत मतभेद असल्याचं बघायला मिळत आहे.
200 वर्ष जुने असलेले ठाणे जेल हे पडघा येथे नेण्यात यावे आणि त्या जागी पार्क उभारावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते नजीब मुल्ला यांनी केली होती. या प्रस्तावाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी पडघा येथे 200 एकर जागा देणार असल्याचे सांगितले आहे. मात्र भाजपचे आमदार संजय केळकर यांनी या वास्तूचे पार्कात रूपांतर करण्यासाठी कडाडून विरोध केला आहे. हा बिल्डर लॉबीचा छुपा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान, आम्ही या पुरातन वास्तूचे पार्कात रूपांतर होऊ देणार नाही, असा इशाराच आमदार केळकर यांनी दिला आहे.
“ठाणे जेलची वास्तू ही 200 वर्ष जुनी आहे. सुरुवातीला या किल्ल्यावर पोर्तुगीज आणि ब्रिटिशांनी राज्य केले. मात्र त्यानंतर अनेक क्रांतिवीरांना येथे फाशी देण्यात आली आहे. त्यामुळे याला एक ऐतिहासिक महत्त्व आहे. ठाणे हे एक सांस्कृतिक शहर म्हणून ओळखले जाते. त्यामुळे ठाणेकरांना हे कधीही आवडणार नाही. जर कायद्यांची संख्या जास्त आहे तर जेलच्या मागेच पाच हेक्टर जागा आहे. तिथे कैद्यांसाठी जागा बांधता येईल”, असं आमदार संजय केळकर म्हणाले.
‘हा बिल्डर लॉबीचा एक डाव’, संजय केळकर यांचा आरोप
“जेलच्या मागच्या बाजूला जैवविविधता उद्यान बांधण्यात येत आहे. कोविड काळात त्याचे काम सुरू झाले. मात्र काही कारणास्तव ते पूर्ण होऊ शकले नाही. मात्र आता पुन्हा एकदा त्या जैवविविधता उद्यानाचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे ठाणेकरांना इथे आणखीन कोणत्याही पार्कची गरज नाही. हा बिल्डर लॉबीचा एक डाव आहे”, असा आरोप संजय केळकर यांनी केला.
दरम्यान, या जेलच्या बाजूलाच ठाणे जिल्हा न्यायालय, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस आयुक्तालय आणि जिल्हा रुग्णालय जवळ असल्याने हीच जेलची योग्य जागा आहे. जे पक्के कैदी आहेत त्यांना पडघा येथे नेण्यात यावे, अशी मागणी देखील केळकर यांनी केली आहे. याआधी हा विषय अधिवेशनात मांडला असून आता पुन्हा एकदा हा विषय अधिवेशनात मांडणार असल्याचे केळकर यांनी सांगितले.