अजित पवारांच्या भेटीनंतर धनंजय मुंडे यांनी केलेल्या वक्तव्याला सुरेश धस यांचं थेट प्रत्युत्तर, राजकारण तापलं
"तुम्ही ट्रायलची भाषा वापरता ना? मग ट्रायल होत नाही तोपर्यंत पदावरुन बाजूला जा. पदावर चिटकून कशाला राहता? उपमुख्यमंत्री अजित पवारांना कशाला सांगायची पाळी आणता? तुम्ही स्वत:हून राजीनामा द्या. ह्यांचं काही वाटोळं होणार नाही. अजित दादांचं पटांगण होणार आहे", असं सुरेश धस म्हणाले.
अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. धनंजय मुंडे यांनी मंत्रालयात जावून उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली. यानंतर मुंडे अजित पवार यांच्या दालनातून बाहेर पडले. यावेळी त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. बीड सरपंच हत्या प्रकरणात आपल्याबाबत मीडिया ट्रायल सुरु असल्याचं धनंजय मुंडे म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्यावर सुरेश धस यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. “कोणतं मीडिया ट्रायल? कोणतं मीडिया ट्रायल? मीडियाला जे दिसतं ते मीडिया मांडतं. मी 15 ते 20 दिवसांपूर्वी मीडियाला माहीतही नसेल मी कोणता गावचा आहे ते. सभागृहात ज्यावेळेस मी मांडलं, त्यानंतर मीडियात गोष्टी आल्या. मीडियाला तुमचं उकरायचं काय पडलं आहे? जे मटेरियल येत आहे ते दाखवण्याचं काम मीडियाने केलं. मीडिया हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. तुम्ही मीडियाला हलक्यात घ्यायला लागलात का? मीडिया ट्रायल वगैरे नाही. हा ओरिजनल ट्रायल आहे. त्यामध्ये आता एक-एक गोष्टी बाहेर येतील”, अशी प्रतिक्रिया सुरेश धस यांनी दिली.
बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुखांना मारहाण करतानाचे व्हिडीओ तपास करणाऱ्या एसआयटीने हस्तगत केले आहेत. एसआयटीने संबंधित व्हिडीओ रिकव्हर केले आहेत. आरोपींच्या फोनमधून हे व्हिडीओ हस्तगत करण्यात आले आहेत. या व्हिडीओत आरोपी संतोष देशमुख यांना मारत होते आणि आनंद लुटत होते, असं एसआयटीने म्हटलं आहे. एसआयटीने हे सर्व व्हिडीओ कोर्टात सादर केले आहेत. यावरही सुरेश धस यांनी प्रतिक्रिया दिली.
‘तुम्ही ट्रायलची भाषा वापरता ना? मग पदावरुन बाजूला जा’
“मी अगोदरच सांगायचो की, हे असं प्रकरण घडलं आहे. ते कुणाला तरी फोन करुन दाखवलेलं आहे. हे अतिशय हीन दर्जाचं प्रकरण आहे. रक्त सळसळ करतं की, या लोकांनी असं कसं केलं? तुम्ही मारलं आहे ना, तर गोळी घातली असती ना, आरोपींनी संतोष देशमुख यांच्या तोंडावर अक्षरश: लघुशंका केली. त्याने पाणी मागितलं तर तोंडावर लघवी केली. इतक्या चुकीच्या पद्धतीने मारलं आहे. तुम्ही आता ब्रेकिंग दाखवत आहात. पण मी सभागृहातच हे सगळं म्हटलं आहे. देशमुखांना मारहाण करत असताना त्याचे व्हिडीओ करुन दाखवण्यात आलं आहे”, असा दावा सुरेश धस यांनी केला.
“ही अतिशय बेकार टोळी आहे. सुदर्शन घुले, प्रतिक घुले, आंधळे हे मुलं 21, 22, 23 वर्षांचे तरुण आहेत. त्यांच्यात एकच 30 वर्षांचा आहे. या तरुणांच आयुष्य कुठे घातलं तुम्ही? संतोषला रिंगण करुन मारलं आहे. इतक्या भयानक परिस्थितीत मारल्यानंतर आमच्या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री म्हणतात, सगळ्या जिल्ह्यात असं अपहरण आणि हत्या होते. संपूर्ण भारत जिल्ह्यात अशा घटना घडतात. हे कोण बोललं आहे? धनंजय मुंडे बोलले आहेत”, असं सुरेश धस म्हणाले.
“तुम्ही ट्रायलची भाषा वापरता ना? मग ट्रायल होत नाही तोपर्यंत पदावरुन बाजूला जा. पदावर चिटकून कशाला राहता? उपमुख्यमंत्री अजित पवारांना कशाला सांगायची पाळी आणता? तुम्ही स्वत:हून राजीनामा द्या. ह्यांचं काही वाटोळं होणार नाही. अजित दादांचं पटांगण होणार आहे. अजित दादांसोबत गेलेले लोकं परत शरद पवारांकडे जातील नाहीतर नवीन पाहतील”, असं सुरेश धस म्हणाले.
एसआयटीला आणखी काय-काय मिळालं?
- 41 इंचाचा एक गॅसचा पाईप ज्याची एक बाजू काळ्या करदोड्याने मूठ बांधलेली
- लोखंडी तारेचे 5 क्लस वायर बसवलेली एक मूठ
- देशमुखांना मारताना वापरलेला 1 लाकडी दांडा
- मारहाणीत वापरलेलं तलवारीसारखं शस्त्र
- 4 लोखंडी रॉड आणि एक कोयता
- लोखंडी फायटर आणि धारधार कत्ती