‘आजही लावालावी करत आहेत, जातीजातीत…’, नारायण राणे यांचा शरद पवार यांच्यावर निशाणा
शरद पवार तुमची प्रत्येक कृती संशयास्पद आहे. मराठ्यांच्या आरक्षणाच्या बाबतीतही तुम्ही राजकारण करत आहात. वय वर्षे 83 पर्यंत तुम्ही स्वत:च्या जातीला न्याय देऊ शकला नाहीत", अशी खोचक टीका नारायण राणे यांनी केली.
भाजप खासदार नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी ‘सामना’ वृत्तपत्र दाखवत महाविकास आघाडीच्या नेत्यांवर निशाणा साधला. नारायण राणे यांनी सुरुवातीला माजी मुख्यमंत्री तथा ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. त्यानंतर त्यांनी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्यावरही निशाणा साधला. “सामना वृत्तपत्रात जी भाषा वापरली जात आहे ती मराठी भाषेची नावलौकिक वाढवणारी आहे? नवीन मराठी शिकणाऱ्यांना मराठी भाषा शिकू नये असं वाटावं, अशी भाषा वापरली जाते? हा माझा प्रश्न आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे गेट आऊट फ्रॉम इंडिया म्हणणारे कोण आहेत? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना गेट आऊट म्हणारे उद्धव ठाकरे कोण? हा कसा नेता होऊ शकतो? याअगोदर पुण्यातही एक घटना घडली होती, तेव्हा झोपला होतास का? तेव्हा नाही. आता निवडणुकीच्या तोंडावर आंदोलन करत आहात. एकतर पाय झिजवताय, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्याकडे मलाच मुख्यमंत्री करा, असं म्हणतात. लाज पण वाटत नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कसे स्वाभिमानी आणि हा माणूस किती स्वार्थी? मी जवळून दृश्य पाहिलं आहे”, अशी टीका नारायण राणे यांनी केली.
“खासदार संजय राऊत काय म्हणतात? शिवद्रोही मिंदे सरकारला जोड्याने फोडून काढले, जोड्याने फोडून काढतात हे मला माहिती नाही. चाबकाने फोडून हाणतात. कधी प्रत्यय दाखवला पाहिजे ना, कसा प्रत्यय असतो, कसं चापकाने फोडतात, लोकं अनवाणी आंदोलनात उतरले. काय शब्द वापरले? शरद पवार या वयातही महाराष्ट्र शांत, सलोखा निर्माण व्हावा यासाठी प्रयत्नशील नाहीत. आजही लावालावी करत आहेत, जातीजातीत भेद निर्माण करत आहेत. चारवेळा मुख्यमंत्री असताना, केंद्रात मंत्री असताना, त्यांनी आरक्षणाची टक्केवारी वाढवली नाही आणि आता ते टक्केवारी वाढवत आहेत. हे भांडणं तुम्हाला अभिप्रेत आहेत? तुम्ही चालत येता? आणि पेटवता लोकांची मने?”, अशी टीका नारायण राणे यांनी केली.
‘शरद पवार तुमची प्रत्येक कृती संशयास्पद’
“शांततेचा एखादा मोर्चा का काढत नाहीत की शांत राहा, एखादा मोर्चा काढा, पुतळा पडला त्यापेक्षा चांगला देखणा पुतळा आपण तयार करुयात. बोलला असतात तर तुमची कीर्ती वाढली असती. शरद पवार तुमची प्रत्येक कृती संशयास्पद आहे. मराठ्यांच्या आरक्षणाच्या बाबतीतही तुम्ही राजकारण करत आहात. वय वर्षे 83 पर्यंत तुम्ही स्वत:च्या जातीला न्याय देऊ शकला नाहीत”, अशी खोचक टीका नारायण राणे यांनी केली.
“मला फोन करुन शिवीगाळ करणारा शरद पवारांचा कार्यकर्ता निघाला. छत्रपतींचा हा महाराष्ट्र लोककल्याणकारी बनावा हे पवारांच्या ध्यानीमनी असायला हवं. शरद पवारांनी बोलायला हवं की, वाद नको. मी तुम्हाला चांगला आर्टिस्ट देता. आपण नव्याने पुतळा उभारावा. पण पेट्रोल टाकूनच ठेवायचं आणि काडी घेऊन फिरायचं, याला महाराष्ट्रात स्थान नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचं राजकारण करता, उद्धव ठाकरे, शरद पवार तुम्हाला काही वाटत नाही? संजय राऊत भडकवण्याचं काम करत आहेत. ते वातावरण बिघडवत आहेत. राज्य सरकारने या प्रकरणी त्वरित कारवाई करावी. काय चेष्ठा आहे का?”, असं नारायण राणे म्हणाले.