जळगावात मंत्री गुलाबराव पाटील यांना डावलून भाजपने अमृत योजनेचा लोकार्पण कार्यक्रम उरकला?
जळगावात भाजपकडून आचारसंहिता लागण्याच्या पार्श्वभूमीवर 253 कोटी रुपयांच्या अमृत योजनेचा लोकार्पण कार्यक्रम घाईघाईत उरकण्यात आला. आचारसंहिता लागणार म्हणून तसेच श्रेय घेण्यासाठी भाजपने मित्र पक्षांना तसेच नगरसेवकांना निमंत्रण न देता जळगाव शहरातील अमृत योजनेचा लोकार्पण सोहळा पार पाडून घेतल्याची चर्चा आहे.
किशोर पाटील, Tv9 प्रतिनिधी, जळगाव : महायुतीत सारं काही आलबेल आहे, असं भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेतेमंडळी बोलत असले तरी स्थानिक पातळीवर काय सुरु आहे, याचा अंदाज बांधणं सध्याच्या घडीला कठीण आहे. विशेष म्हणजे जळगावात महायुतीत वितुष्ट आल्याचं चित्र आहे. कारण जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी महायुतीचा मेळावा आयोजित केला होता. या कार्यक्रमाला मंत्री गुलाबराव पाटील आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी वगळता मित्र पक्षांमधील कुणीही आलं नव्हतं. विशेष म्हणजे मंत्री गिरीश महाजन, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्यासह जिल्ह्यातील आमदार खासदारांना निर्धार मेळाव्याचं निमंत्रण देण्यात आलेलं होतं. पण त्यांनी सर्वांनी पाठ फिरवली होती. त्यामुळे गुलाबराव पाटील यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आज गुलाबराव पाटील यांच्या अनुपस्थितीत जळगावात 253 कोटी रुपयांच्या अमृत योजनेचा लोकार्पण कार्यक्रम पार पडला. त्यामुळे जळगावात विविध चर्चांना उधाण आलं आहे.
जळगावात नेमकं काय घडलं?
जळगावात भाजपकडून आचारसंहिता लागण्याच्या पार्श्वभूमीवर 253 कोटी रुपयांच्या अमृत योजनेचा लोकार्पण कार्यक्रम घाईघाईत उरकण्यात आला. आचारसंहिता लागणार म्हणून तसेच श्रेय घेण्यासाठी भाजपने मित्र पक्षांना तसेच नगरसेवकांना निमंत्रण न देता जळगाव शहरातील अमृत योजनेचा लोकार्पण सोहळा पार पाडून घेतल्याची चर्चा आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील जळगाव जिल्ह्यातच असताना निमंत्रण न देता त्यांच्या अनुपस्थितीमध्ये भाजपने घाईघाईत कार्यक्रम पार पाडून घेतल्याची चर्चा आहे. मंत्री गुलाबराव पाटील तसेच जळगाव शहरातल्या सर्व नगरसेवकांना डावलून घाईघाईत भाजपने कार्यक्रम पार पाडल्याच सांगत शिवसेना ठाकरे गटाचे महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी नाराजी व्यक्त केली. भाऊंच्या उद्यानात जळगाव लोकसभेच्या खासदार स्मिता वाघ यांच्या हस्ते जळगाव शहरातील अमृत योजनेचा लोकार्पण सोहळा पार पडला.
घाईघाईत कार्यक्रम उरकण्यामध्ये लोकार्पण फलकावर चूक
आचारसंहिता लागणार असल्यामुळे घाईघाईत कार्यक्रम उरकण्यामध्ये मान्यवरांच्या नावांमध्ये लोकार्पण फलकावर चूक झाली. विधान परिषद सदस्य सत्यजित तांबे यांच्या नावामध्ये चूक करण्यात आली. फलकावर केवळ सत्यजि अशाच पद्धतीचं नाव दिसून आलं. शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या लोकप्रतिनिधींना कार्यक्रमांत निमंत्रण देण्यात आलेलं नव्हतं अशी माहिती आहे. कार्यक्रमाला फक्त भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. विशेष म्हणजे मंत्री गुलाबराव पाटील हे जळगाव जिल्ह्यात असताना सुद्धा खासदार स्मिता वाघ यांनी ते मुंबईला असल्यामुळे कार्यक्रमाला येऊ शकले नाही, असं सांगून टाकलं.