हिंदू सण जल्लोषात साजरे करण्याची परवानगी द्या, अजानच्या आवाजाबाबत मुंबईकर नाराज-भाजप
हिंदू नववर्षाच्या निमित्ताने गुढीपाडव्याला (Gudipadva) निघणाऱ्या शोभायात्रेला परवानगी द्या. तसेच राम नवमीच्या मिरवणुका काढण्यास व हिंदू सण जल्लोषात साजरे करण्यास परवानगी द्या, अशी मागणी मुंबई भाजपा शिष्टमंडळाने मुंबई पोलीस उपायुक्त यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली.
मुंबई : या सरकारकडून हिंदू सणांच्या (Hindu) बाबतीत दुजाभाव होत असल्याचा आरोप भाजप (Bjp) करत आहे. त्यातच आता हिंदू नववर्षाच्या निमित्ताने गुढीपाडव्याला (Gudipadva) निघणाऱ्या शोभायात्रेला परवानगी द्या. तसेच राम नवमीच्या मिरवणुका काढण्यास व हिंदू सण जल्लोषात साजरे करण्यास परवानगी द्या, अशी मागणी मुंबई भाजपा शिष्टमंडळाने मुंबई पोलीस उपायुक्त यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली. मुंबई पोलीस प्रशासन यंत्रणेकडून ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी नाविन्यपूर्ण कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. ध्वनी प्रदूषणाच्या विविध कारणांचा मुंबईकर आपल्या दैनंदिन आयुष्यात सामना करत असतात. त्यातील एक महत्त्वाचे कारण म्हणजे प्रार्थना स्थळांमधून लाऊडस्पीकरवरून केली जाणारी अजान आहे. कोणीही अजानच्या विरोधात नसून लाऊडस्पीकरच्या माध्यमातून मोठ्या आवाजात अजान दिल्यामुळे ध्वनिप्रदूषण होत असून मुंबईकरांचा याला विरोध आहे. मुंबईकरांच्या भावना मुंबई पोलीस उपायुक्तांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी मुंबई भाजपा शिष्टमंडळानं पोलीस उपायुक्तांची भेट घेतली आणि हिंदू सण जल्लोषात साजरे करण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती करणारे निवेदन सुपूर्द केले.
निवेदनात नेमकी मागणी काय?
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, दि. 2 एप्रिल 2022 रोजी हिंदू नववर्षानिमित्त गुढीपाडवाच्या दिवशी सालाबादप्रमाणे मुंबईत ठिकठिकाणी नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात येते. हिंदू नववर्ष स्वागत यात्रेची तयारी मुंबईत जल्लोषात सुरु आहे. या यात्रेला परवानगी द्यावी, त्याचबरोबर 10 एप्रिल 2022 रोजी रामनवमी, 14 एप्रिल 2022 रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व 16 एप्रिल रोजी हनुमान जयंती हे सण साजरे करण्यासाठी संपूर्ण हिंदू समाज उत्सुक असून या कार्यक्रमांना परवानगी द्यावी.
पोलीस काय निर्णय घेणार?
या भेटीदरम्यान मुंबई भाजपा अध्यक्ष व आमदार मंगल प्रभात लोढा, आमदार अतुल भातखळकर, आमदार कालिदास कोळंबकर, आमदार राहुल नार्वेकर, आचार्य पवन त्रिपाठी, दक्षिण मध्य मुंबई जिल्हाअध्यक्ष राजेश शिरवडकर, मुंबई भाजपा उत्तर भारतीय मोर्चा अध्यक्ष श्री. जयप्रकाश सिंह आदी मान्यवर उपस्थित होते. मुंबई पोलिसांनी हे निवदेन स्वीकारले असून मुंबई पोलीस आता याबाबत काय निर्णय घेणार हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे. गेल्या अनेक दिवसात कोरोनामुळे सण साजरे करण्यावर काही मर्यादा घालण्यात आल्या होते. आता या मर्यादा हटवल्या जाण्याची शक्यता आहे.