शरद पवार धमकी प्रकरणात 7 दिवसानंतर सौरभ पिंपळकर माध्यमांसमोर, त्या ट्विटवर म्हटले…
Sharad Pawar Threat : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना धमकी प्रकरणात पुण्यातून एका अटक करण्यात आली होती. तसेच या प्रकरणात अमरावती येथील भाजप कार्यकर्ते सौरभ पिंपळकर यांचे नाव समोर आले होते. त्यांनी आता खुलासा केला आहे.
स्वप्निल उमाप, अमरावती : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा प्रकार ९ जून रोजी उघड झाला होता. फेसबुक पेजवरुन शरद पवार यांना धमकी देण्यात आली होती. खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. त्यानंतर त्यांनी पोलीस आयुक्तांना भेटून या प्रकरणी तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी धमकी प्रकरणात पुणे शहरातून सागर बर्वे (३४) याला अटक करण्यात आली. तसेच या प्रकरणी अमरावती येथील भाजप कार्यकर्ते सौरभ पिंपळकर यांचे नाव येत होते. अखेरी सात दिवसांनंतर सौरभ पिंपळकर माध्यमांसमोर आला अन् आपली भूमिका मांडली.
काय म्हणाले सौरभ पिंपळकर
शरद पवार धमकी प्रकरणातील सौरभ पिंपळकर 7 दिवसानंतर माध्यमांसमोर आले. त्यांनी म्हटले की, शरद पवार यांच्या धमकी प्रकरणात माझा काहीही संबंध नाही. शरद पवार यांचा दाभोळकर होईल, या पोस्टशी माझा काहीच संबंध नाही. मात्र सुप्रिया सुळे यांनी ते ट्विट माझ्या नावाने दाखवलं. माझ्यावर आरोप केले. मी सुप्रिया सुळे, रोहित पवार, अमोल मिटकरी आणि जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध मानहानीचा दावा दाखल करणार आहे.
त्या ट्विटशी संबध नाहीच
शरद पवार यांचा दाभोळकर होईल, असे कोणतेही ट्विट मी केलं नाही किंवा शेअरही केले नाही. त्या ट्विटला मी लाईक सुद्धा केले नाही. मी जे ट्विट केलं होते, त्यामध्ये औरंगजेब हा सुपारी कतरण खात होता, त्याच तोंड वाकडं होऊन गेला, त्याची इतिहासात पुनरावृत्ती होणार, असे म्हटले होते. त्यात यात शरद पवार यांचे कुठेही नाव नव्हतं. त्यांनी माझ्यासोबत माझ्या पक्षालाही बदनाम करण्याचा प्रयत्न केला. परंतु माझ्यासोबत माझा भारतीय जनता पक्ष खंबीरपणे उभा होता. या प्रकरणाचा माझ्या परिवाराला मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागला. त्यामुळे सुप्रिया सुळे माझ्या आई-वडिलांची अन् पक्षाची माफी मागणार का? असा प्रश्न सुद्धा सौरभ पिंपळकर यांनी उपस्थित केला.
आयुष्यभर सुपारी कत्रत खाल्ल्यामुळे औरंगजेबाच तोंड मरताना वाकड होऊन मेल म्हणते हे खरं आहे का? अस असेल तर इतिहास पुनरावृत्ती करणार म्हणजे ??
— SauRabh Pimpalkar (@SrbhBJP) June 8, 2023
पुण्यातून एकास झाली होती अटक
शरद पवार यांना धमकी दिल्याप्रकरणी पुणे शहरातून सागर बर्वे (३४) याला चार दिवसांपूर्वीच अटक करण्यात आली. त्यानेच शरद पवार यांना ‘नर्मदाबाई पटवर्धन’ या फेसबुक पेजवरुन ‘तुमचा लवकरच दाभोलकर करू’ अशी धमकी दिली होती. पोलिसांनी तांत्रिक तपास केल्यानंतर ‘नर्मदाबाई पटवर्धन’ या नावाचे फेसबुक पेज पुण्यातील इंजिनिअर सागर बर्वे चालवत असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्याला अटक केली. सागर बर्वे हा आयटी इंजिनिअर आहे.