धर्मावरुन चिथावणी देणाऱ्या भाजपच्या नितेश राणेंना भाजपच्याच हाजी अराफत यांचं आव्हान
धर्माच्या मुद्द्यांवरुन सध्या भाजपच्याच दोन नेत्यांमध्ये जुंपली आहे. नितेश राणेंनी जी विधानं केलीत, त्यावरुन भाजपचे हाजी अराफत यांनी पक्षालाच भूमिका मांडण्याचं आवाहन केलं आहे.
धर्मावरुन चिथावणी देणाऱ्या भाजपच्या नितेश राणेंना भाजपच्याच हाजी अराफत यांनी आव्हान दिलंय. मात्र भाजपनं राणेंना खरा धर्म शिकवावा. आम्ही मराठी संस्कृती मानणारे मुस्लिम आहोत असं म्हणत अराफत यांनी भाजपलाच सल्लाही देवून टाकला आहे. वाद सुरु झाला होता रामगिरींनी केलेल्या वादग्रस्त विधानावरुन आता विरोधाभास हा आहे की दोन्ही नेते भाजपचे आहेत. एक आमदार….दुसरे भाजपच्या अल्पसंख्य अर्थात मुस्लिम विभागाचे नेते. हे दोन्ही नेते फडणवीसांना आपला नेता मानतात. नितेश राणे फडणवीसांच्याच दाखल्यानं धमकी देतात. आणि हाजी अराफत राणेंवर कारवाईसाठी फडणवीसांना पत्र लिहितात.
दोन्ही नेते भाजपात असले तरी मुद्दयांवरुन मात्र दोघांचं सुतरामही जुळत नाही. पण दोघांच्या भूमिका बघितल्या तर यांच्या वादात भाजपच्याच भूमिकेवर सवाल करत आहेत.
राणेंच्या मते मविआनं निवडणुकीत मुस्लिमांना जवळ करुन मतं मिळवली. अराफत म्हणतात की सरकारच्या मदतीनं उर्दु भवनाद्वारे मी मुस्लिमांना भाजपशी जोडलं. राणे सांगतात की गृहमंत्री फडणवीस हिंदुत्ववादी. असल्यामुळे आम्हाला कुणीही रोखू शकत नाही.
अराफत म्हणतात की मुस्लिमांना मशिदीत घुसून मारु…ही कुणाची भूमिका आहे, पक्षानं स्पष्ट करावं. राणेंच्या मते मविआसोबत जावून ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं. त्यांना धर्मावर बोलण्याचा अधिकार नाही.
अराफत भाजपला सांगतायत की नितेश राणेंना भाजपनं हिंदुत्व काय, श्री राम कोण होते हे शिकवायला हवं. राणे म्हणतात की लँड जिहादच्या माध्यमातून हिंदूंच्या जमिनी हडपल्या जात आहेत.
अराफत सांगतात की वांद्रेतलं कबरीस्थान फडणवीसांच्याच पुढाकारानं मंजूर झालं. नितेश राणे सभांमधून म्हणतात की आपले गृहमंत्री आहेत, आमचं कुणीही काहीच बिघडवू शकत नाही.
अराफतांच्या मते फडणवीसांनी पत्र लिहून मी नितेश राणेंना समज द्यायला सांगितली आहे. भाजपचा दावा आहे की विरोधक राज्यातली स्थिती बिघडवण्याच्या प्रयत्न करतायत. जपचेच अराफतांच्या मते नितेश राणेंची विधानं राज्यातलं वातावरण खराब करतायत.
नितेश राणे वादग्रस्त विधानांवर म्हणतात की आमचा बॉस म्हणजे फडणवीस सागर बंगल्यावर आहेत, आम्हाला काहीच होणार नाही. भाजपचेच हाजी अराफत म्हणतात की, मी देवेंद्रजींचा कार्यकर्ता आहे., माझी भूमिका कायम पक्षासोबत राहण्याची आहे.
म्हणजे एकीकडे भाजपचे नितेश राणे फडणवीसांचं नाव घेवून धमकीची भाषा करतात आणि दुसरीकडे भाजपचेच मुस्लिम नेते अराफत फडणवीसांना नेते मानून राणेंवर कारवाईसाठी पत्रही लिहितात.
मात्र गेल्या अनेक दिवसांपासून नितेश राणे वादग्रस्त विधानं करत असताना भाजपचे हाजी अराफत इतके दिवस कुठे होते. नेमकं निवडणुकांच्याच तोंडावर त्यानं का बोलावं वाटलं…हे सारं ठरवून केलं जातंय का… असे प्रश्न विरोधक विचारत आहेत.