उल्हासनगरात सेंच्युरी कंपनीत भीषण स्फोट; किती कामगार दगावले?
उल्हासनगरच्या सेंच्युरी कंपनीत भीषण स्फोट झाला आहे. या कंपनीत झालेल्या स्फोटात पाच ते सहा कामगार ठार झाले आहेत. हा स्फोट कशामुळे झाला याची माहिती मिळू शकली नाही.
उल्हासनगर | 23 सप्टेंबर 2023 : उल्हासनगरच्या सेंच्युरी कंपनीत भीषण स्फोट झाला आहे. या कंपनीत झालेल्या स्फोटात पाच ते सहा कामगार ठार झाले आहेत. हा स्फोट कशामुळे झाला याची माहिती मिळू शकली नाही. मात्र, या भीषण स्फोटामुळे एकच खळबळ उडाली आहे. तर या स्फोटानंतर आगीवर नियंत्रण आणण्याचं काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आलं आहे. फॅक्ट्रीला लागलेली आग अधिक पसरू नये म्हणून काळजी घेतली जात आहे.
उल्हासनगरला वस्तीच्या बाजूला ही फॅक्ट्री आहे. या फॅक्ट्रीत अचानक स्फोट झाला. अन् काही क्षणात आग पसरली. त्यामुळे कामगारांमध्ये एकच धावपळ उडाली. बघता बघता आगीने आक्राळविक्राळ रुप धारण केलं. या स्फोटात पाच ते सहा कामगार दगावल्याचं सांगितलं जात आहे. तर जखमींचा आकडा अजून आलेला नाही. फॅक्ट्रीत झालेल्या स्फोटाचा आवाज प्रचंड मोठा होता. त्यामुळे कामगारांमध्ये एकच धावपळ उडाली. तर आवाजामुळे आसपासच्या परिसरातील लोकही धावतच घराबाहेर पळाले. काय झालं ते स्थानिकांना कळेना. आवाजाच्या दिशेने स्थानिकांनी धाव घेतली तेव्हा त्यांना सेंच्युरी कंपनीतून निघणाऱ्या आगीच्या ज्वाळा आणि धूर दिसला. त्यामुळे लोकांनी एकच आरडाओरड सुरू केली.
अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न
काही स्थानिकांनी पाणी ओतून आग विझवण्याचा प्रयत्न केला. तर काही जणांनी अग्निशमन दलाला या घटनेची माहिती दिली. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले आहेत. या जवानांनी आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत. तसेच फॅक्ट्रीत अडकलेल्या कामगारांना सुखरूप बाहेर काढण्याचे प्रयत्नही सुरू केले आहेत. फॅक्ट्रीत किती कामगार आहेत याची काहीच कल्पना नाहीये. तसेच मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
आगीचं कारण गुलदस्त्यात
फॅक्ट्रीच्या भोवती प्रचंड गर्दी झाली आहे. पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य सुरू केल्याचं सांगितलं जातं. दरम्यान, आग कशाने लागली? त्यामागचं कारण काय हे काहीच सांगण्यात आलेलं नाही. अग्निशमन दलाकडून या आगीची प्राथमिक चौकशी केली जाणार असल्याचंही सूत्रांनी सांगितलं.