Nashik| पतंग उडवताना बाळाच्या आयुष्याची दोरी तुटली…दोन मिनिटांत होत्याचे नव्हते!
प्रज्वल मृत्यूच्या बातमीमुळे त्याच्या वर्गमित्रांनाही धक्का बसला आहे. आत्ताच खेळणारा आपला मुलगा असा गेल्याने प्रज्वलच्या आई-वडिलांनी आकांत मांडला होता.
नाशिकः एक अत्यंत चटका लावणारी घटना नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नरमध्ये घडलीय. त्यामुळे लहान मुलांमध्ये प्रचंड धास्तीय आणि परिसरात हळहळ व्यक्त होतेय. एका सात वर्षांच्या मुलाचा पतंग उडवताना विहिरीत पडून मृत्यू झालाय. आपल्यासोबत खेळणारा मित्र क्षणार्धात आपल्या आयुष्यातून नाहीसा होतो, हा धक्का पचवणेच त्यांना जड जात आहे.
असा घडला अपघात?
सिन्नरमधल्या यशवंतनगर भागात ही दुर्घटना घडली. प्रज्वल पांडुरंग आव्हाड हा मुलगा आपल्या मित्रांसोबत पतंग उडवत होता. त्यांचा खेळ ऐन रंगात आलेला. मित्रांचे पतंग मस्त हवेत उडत असलेले. प्रज्वलने आपला पतंग उडवणे सुरू केलेले. तितक्यात काय झाले माहिती नाही. प्रज्वलने पतंग पकडण्यासाठी देहभाग विसरून धाव घेतली. त्यात त्याचा तोल जाऊन तो विहिरीत कोसळला. या विहिरीत दोन परस पाणी होते. प्रज्वला पोहता येत नव्हते. त्याच्यासोबतच्या कोणत्याही लहान मुलांना पोहता येत नव्हते. त्यांनी आरडाओरडा केला. थोड्या वेळ्यात परिसरातील नागरिकांनी धाव घेतली. मात्र, दोन मिनिटांत होत्याचे नव्हते झाले. प्रज्वलचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
वाजे विद्यालयाचा विद्यार्थी
प्रज्वल हा लोकनेते शं. बा. वाजे विद्यालयात दुसरीच्या वर्गात शिकत होता. प्रज्वल मृत्यूच्या बातमीमुळे त्याच्या वर्गमित्रांनाही धक्का बसला आहे. आत्ताच खेळणारा आपला मुलगा असा गेल्याने प्रज्वलच्या आई-वडिलांनी आकांत मांडला होता. नगरपरिषदेच्या रुग्णालयात त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय माळी व हवालदार एन. ए. पवार हे याप्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
डिसेंबरमध्ये पतंगोत्सव
दरवर्षी डिसेंबरमध्ये नाशिक जिल्ह्यात जोरदार पतंगोत्सव रंगतो. गावागावात आणि गल्ल्यागल्ल्यात मुले पतंग उडवतात. त्यापुढे त्यांना कशाचेही भान नसते. अनेकजण गच्चीवर तर अनेक जण मोकळ्या जागात पतंग उडवत काटाकाटीत रमतात. मात्र, काही वर्षांपासून पतंग उडवण्यातून होणाऱ्या अपघातामध्ये वाढ झाल्याचे निरीक्षण पोलीस नोंदवत आहेत. त्यासाठी पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष द्यावे. सुरक्षित ठिकाणी खेळ खेळावेत असे आवाहन त्यांनी केले आहे.
मांजा धोकादायक
पंतग उडवण्यासाठी मुले नायलॉनच्या मांजाचा सर्रास वापर करतात. त्यामुळे वाहनधारकांचे गळे चिरल्याच्या घटना घडला आहेत. अनेकदा यामुळे काही अपघात घडत नाहीत. मात्र, पंतग उडवताना अनेकांचे पतंग हे झाडावर, उंच ठिकाणी अडकून पडतात. त्यासोबत मांजाही लटकतो. खराब झालेले पतंग आणि मांजा काढण्याची तसदी कोणीही घेत नाही. मात्र, यामुळे दरवर्षी हजारो पक्ष्यांचे प्राण जातात. त्यामुळे या मुक्या जीवासाठी तरी नायलॉनचा मांजा वापरू नये, असे आवाहन पर्यावरण प्रेमींनी केले आहे.
इतर बातम्याः
No water in Nashik| नाशिककरांना आज निर्जळी; कोणत्या भागात येणार नाही पाणी, घ्या जाणून…!