बातमी छापली म्हणून पत्रकाराला अश्लील शिविगाळ, जीवे मारण्याचीही धमकी! महाराष्ट्रात कुठे घडला प्रकार?
तक्रार देऊनही कोणतीही कारवाई होत नसल्याचा आरोप केला जात होता. म्हणून पत्रकार आकाश पाटील यांनी उपविभागीय अधिकारी खाम यांच्या कार्यालयासमोर पाच दिवस उपोषण केलं.
बुलडाणा: महाराष्ट्रातील बुलडाणा जिल्ह्यामध्ये एका पत्रकाराला (Threats to journalist in Buldana) बातमी छापली म्हणून धमकावण्यात आलं आहे. तसंच अश्लील शिविगाळही (foul language) करण्यात आली आहे. बुलडण्यातील खामगावात हा प्रकार घडला आहे. खामगावच्या पाणीपुरवठा अभियंत्यावर पत्रकाराला धमकावण्याचा आणि त्याला शिविगाळ करण्याचा आरोप करण्यात आला. याप्रकरणी पोलिस तक्रार दिल्यानंतर संबंधित अभियंत्याविरोधात गुन्हादेखील दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, सुरुवातीला तक्रार देऊनही कारवाई झाली नव्हती. त्यामुळे ज्या पत्रकाराला शिविगाळ करण्यात आली, त्यानं पाच दिवस उपोषण केलं होतं. यानंतर स्थानिक पत्रकारांनी एकत्र येत या संपूर्ण प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त करत आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर पोलिसांनी (Buldana Police) नरमाईची भूमिका घेत अखेर गुन्हा दाखल केला आहे.
ती बातमी नेमकी काय होती..?
बुलडाण्यातील खामगावावत पत्रकार आकाश पाटील यांनी 25 जानेवारी 2022 रोजी आपल्या वृत्तपत्रात एक बातमी छापली. ग्रामीण पाणीपुरवठा योजना, खामगाव, या संदर्भात ही बातमी होती. या बातमीवर जिल्हा परिषदेचे ग्रामीण पाणीपुरवठा अभियंता चिडले. अभियंता व्ही एम चव्हाण आणि जाधव नावाच्या कर्मचाऱ्यांनी फोनकरुन पत्रकार आकाश पाटील यांना शिवीगाळ केली. तसंच त्यांना जीवे मारण्याचीही धमकी दिली.
पोलिस तक्रारीस विलंब
दरम्यान पोलीस तक्रार देऊनही कोणतीही कारवाई होत नसल्याचा आरोप केला जात होता. म्हणून पत्रकार आकाश पाटील यांनी उपविभागीय अधिकारी खाम यांच्या कार्यालयासमोर पाच दिवस उपोषण केलं. त्यानंतर जिल्ह्यातील पत्रकारांनी आंदोलनाचा इशारा दिला. अखेर पोलीस प्रशासनानं नमतं घेत संबंधितांवर गुन्हा दाखल करुन घेतलाय.