महाराष्ट्राचे खरे वाघ कोण ? अन् कोल्हे, कुत्रे लांडगे कोण? ठाकरे गटाला कुणी सुनावलं?
संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे गटावर काल जहरी टीका केली. लाचार, लोचट, लाळघोटे अशा शब्दांनी निशाणा साधला. यावरून संजय गायकवाड यांनी प्रत्युत्तर दिलंय.
गणेश सोलंकी, बुलढाणा: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राज्यभरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन भेटी दिल्या. मात्र प्रत्यक्ष शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जात नाहीये, या सगळ्या वांझोट्या भेटी आहेत, अशी टीका अंबादास दानवे यांनी केली. त्यामुळे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी दानवे यांना जशास तसे प्रत्युत्तर दिलंय. जेवढी मदत शिंदे सरकारने केली तेवढी उभ्या आयुष्यात कुण्या सरकारने केलेली पाहिलीय का? अगोदरचे सरकार पर्जन्यमापकावर मदत करत होते, मात्र आताच्या सरकारने सततच्या पावसामुळे आपत्कालीन मदत जाहीर करण्याचा नियम केला. त्यामुळे केवळ विरोधाला विरोध करू नका, असं संजय गायकवाड यांनी सुनावलंय. तसेच अरविंद सावंत आणि संजय राऊत यांच्यावरही गायकवाड यांनी जहरी टीका केली.
महाराष्ट्रातले खरे वाघ कोण?
सावंत आणि राऊत यांच्यावर टीका करताना संजय गायकवाड म्हणाले, ‘ महाराष्ट्रातले खरे वाघ कोण आहेत.. कोल्हे, कुत्रे, लांडगे कोण आहेत, हे महाराष्ट्रातील जनतेला ठाऊक आहे. आम्ही गेली ३५ वर्षे वाघासारखे जगलो..खऱ्या अर्थाने ज्यांचा शीवसेनेशी संबंध आला नाही, तेच लोक आता वाघाचे पांघरून बसलेत.आम्ही कुठेही गेलो नाहीत, गेले ते शेळ्या मेंढ्यांच्या कळपात. आमचा वाघाचा कळप स्वतंत्र आहे. आम्ही कोण्या कळपात गेलो नाही. अरविंद सावंत, राऊत असतील हे काँग्रेस राष्ट्रवादीच्या कळपात जाऊन तुमचा वाघ विसरले. तुम्ही शेळी झाले, कुत्रे झाले, मेंढी झाले, तुम्हाला बोलायचा आधिकर नाही, अशा शब्दात संजय गायकवाड यांनी सुनावलंय.
त्यांना लाथा घालून बाहेर काढा…
संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे गटावर काल जहरी टीका केली. लाचार, लोचट, लाळघोटे अशा शब्दांनी निशाणा साधला. यावरून संजय गायकवाड यांनी प्रत्युत्तर दिलंय. ते म्हणाले, ‘ ज्या मातोश्री वर हिंदुत्वाचे धडे दिले, त्या मातोश्रीवर काँग्रेस राष्ट्रवादी सोबत मांडीला मांडी लावून बसता, त्यांना लाथा घालून बाहेर काढा, सोडा न पक्ष तुम्ही.. बाळासाहेब यांनी कधी काँग्रेस राष्ट्रवादीसोबत मैत्री केली का? काही तरी लाज वाटू द्या बाळासाहेबांच्या विधानाची..आम्हाला काय शहाणपणा शिकवता..शिंदे सरकार पक्कं आहे, आमची काळजी करू नाका..बाळासाहेबांचं अम्हाला अभिमान आहे , अशा शब्दात गायकवाड यांनी संजय राऊत यांना सुनावलंय.