Buldana Crime : माजी आमदाराच्या अपहरणाचा प्लॅन, दिल्लीतून आयबीने तिघांना उचलले
बुलडाण्यातून धक्कादायक बातमी समोर येतेय. बुलडाणा अर्बनच्या भाईजी आणि माजी आमदार चैनसुख संचेतींना किडनॅप करण्याचा प्लॅन होता. पण, दिल्लीतून आयबीने तिघांना उचलले.
झटपट श्रीमंत होण्यासाठी चुकीच्या मार्गाचा अवलंब करणाऱ्या तिघांना दिल्लीत (Delhi) आयबीने अटक केलीय. अटक करण्यात आलेले तिघेही संशयित बुलडाणा शहरातील रहिवासी आहेत. तिघा आरोपींना बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी त्या तिघांची चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. श्रीमंत होण्यासाठी बुलडाणा अर्बनचे (Buldana Urban) संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक आणि मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा चैनसुख संचेती (Channelal Sancheti) या दोघांनाही किडनॅप करण्याचा प्लॅन तिघांनी रचल्याचे समोर आले.
अशी आहेत आरोपींची नावे
मिर्झा आवेज बेग, शेख साकीब शेख अन्वर, उबेद खान शेर खान, अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. ते बुलडाणा शहरातील शेर -ए -अली चौकातील राहणारे आहेत. तिघेही काही दिवसांआधी दर्शनाकरिता अजमेर येथे गेले होते. बेरोजगारीला कंटाळून त्यांनी श्रीमंत होण्याचा प्लॅन आखला. बँक लुटण्यासाठी त्यांनी एक एअर गनसुद्धा विकत घेतली होती. बँक लुटल्यानंतर कार खरेदी करायची, ऑफिस बनवायचे आणि एखाद्या श्रीमंत व्यक्तीला किडनॅप करून कोट्यवधी रुपये कमवायचे असा प्लॅन त्यांचा होता.
संशयित म्हणून ताब्यात घेतले
दिल्लीत आयबी पोलिसांनी संशयित म्हणून त्यांना ताब्यात घेतले. अशी माहिती ठाणेदार प्रल्हाद काटकर यांनी दिली. बुलडाणा पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली. त्यांना बुलडाणा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
यांच्या अपहरणाचा होता प्लॅन
चौकशीदरम्यान राधेश्याम चांडक आणि माजी आमदार चैनसुख संचेती यांना किडनॅप करण्याचा त्यांचा प्लॅन होता, असे त्यांनी पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी तिघांविरुद्ध बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात प्रतिबंधात्मक कारवाई केली. पोलीस त्यांच्यावर लक्ष ठेऊन आहेत .