व्यापाऱ्याला लूटण्याचा प्लॅन फसला; नकली पोलिसांच्या टोळीतील एकाला अटक
बुलडाणा जिल्ह्यातील शेगावमधून एक विचित्र प्रकार समोर आला आहे. घरात सुख शांती लाभावी आणि आर्थिक फायदा व्हावा यासाठी व्यापाऱ्याला तुमच्या घरात पुजा करावी लागेल असे सांगून लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. यातील एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
बुलडाणा : जिल्ह्यातील शेगावमधून एक विचित्र प्रकार समोर आला आहे. घरात सुख शांती लाभावी आणि आर्थिक फायदा व्हावा यासाठी व्यापाऱ्याला तुमच्या घरात पुजा करावी लागेल असे एका टोळीकडून सांगण्यात आले होते. व्यापारी देखील या पुजेसाठी तयार झाला होता, त्याने पुजेसाठी संबंधित टोळीला रोख सहा लाख रुपये आणि सात लाखांचा चेक दिला होता. ही टोळी हे पैसे घेऊन फरार होण्याच्या तयारीत असतानाच त्यातील एकाला पोलिसांनी अटक केली आहे.
पुजेसाठी सहा लाखांची मागणी
संतोषसिंह मन्नुसिंह ठाकूर असे या फसवणूक झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. घटनेबाबत अधिक माहिती अशी की, संतोषसिंह हे गेल्या काही दिवसांपासून आर्थिक अडचणीमध्ये होते. त्यांना व्यवसायात तोटा झाला होता. त्यानंतर ते एका टोळीच्या संपर्कात आले, तुमच्या घरात जर तुम्हाला सुखशांती हवी असेल तर तुम्हाला पुजा करावी लागेल. त्यासाठी सुवर्ण भस्माची आवश्यकता आहे. असे या टोळीकडून या व्यापाऱ्याला सांगण्यात आले. ठरल्याप्रमाणे व्यापाऱ्याने सुवर्ण भस्मासाठी या टोळीला रोख सहा लाख रुपये आणि सात लाखांचा एक चेक दिला.
एकाला अटक
दरम्यान हे पैसे घेतल्यानंतर आधीच ठरलेल्या नियोजित कटानुसार ही टोळी आणि संबंधित व्यापारी पुजेसाठी खामगाववरून वसमतकडे निघाले असताना शेवगाव परिसरामध्ये नकली पोलिसांच्या टोळीने त्यांची गाडी अडवली. बनावट पोलिसांनी व्यापाऱ्याला मारहाण करत पैसे लुटून घटनास्थळावरून पोबारा केला. मात्र व्यापाऱ्याच्या सुदैवाने त्याचवेळी परिसरात गस्त घालण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या हा प्रकार लक्षात आल्याने त्यांनी मोठ्या शिताफीने यातील एका आरोपीला अटक केली आहे. शेख शब्बीर शेख गुलाब रा .बर्डे प्लाट खामगाव असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. इतर आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
संबंधित बातम्या
Pimpri Chinchwad crime| सांगवीतील काटेपुरम चौकात भरदिवसा गोळीबार; एक जखमी, हल्लेखोर पसार
Pune crime |पशुसंवर्धन अधिकाऱ्याकडून दोन लाखांची खंडणी उकळणाऱ्या तरुणीसह तिघांना अटक
वीजबिलाच्या पैशांवरून वाद, घरमालकाने केली भाडेकरूची हत्या; पत्नीवरही केला प्राणघातक हल्ला